

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, बूट, दप्तरासह इतर आवश्यक सुविधा वेळेत पुरवून शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे.
उद्या सोमवारी (दि.16) शाळा प्रवेशाच्या दिवशी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेले पालक अधिकारी समक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपायुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव यांच्यासह महापालिकेतील इतर वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या प्रत्येक शाळेवर पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे पालक अधिकारी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा, खेळांचा सुविधांचा दर्जा, शालेय पोषण आहार, शाळेतील इतर पूरक व्यवस्था, आदींची पाहणी करतील. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांचा आणि शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढण्यास खचितच मदत होणार आहे.
डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले. शाळेचा परिसर फुलांचे तोरण, फुगे लावून व रांगोळी काढून सजविण्यात आला होता. इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा समितीच्या अध्यक्षा ऍडव्होकेट ललिता जोशी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण केले. तसेच विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले. पुस्तकांशी मैत्री करा व शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका, असा संदेश ऍडव्होकेट ललिता जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका पल्लवी चौधरी यांच्यासह पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.