

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) रात्री कल्याणातील बेघरांच्या निवारा केंद्राची अचानक पाहणी केली. तेथील थंडी वाढल्याने या केंद्रातील गरिबांना कसली अडचण तर नाहीय ना, याबद्दल त्यांची उपायुक्त जाधव यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बेघरांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंग वाडी, तसेच टिटवाळा आणि कल्याण पश्चिमेत महानगरपालिकेने बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्रात राहण्या-खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. या निवारा केंद्रांत बेघर व्यक्तींना चहा, नाष्टा, जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते.
शनिवारपासून (दि.30 नोव्हेंबर) कल्याण-डोंबिवलीमध्ये वाढलेल्या गारठ्याच्या पार्श्वभूमीवर समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी रात्री 11 वाजता कल्याण पश्चिमेतील क प्रभागाजवळ असलेल्या तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बेघरांच्या निवारा केंद्राला तसेच डोंबिवलीच्या पांडुरंग वाडीतील सावली निवारा केंद्राला भेट दिली. तेथे बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी आणि सुविधांची पाहणी केल्यानंतर उपायुक्त जाधव यांनी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रात्रीच्या वेळी पडलेल्या कडाक्याच्या थंडीचे स्वरूप पाहता तेथील बेघरांना पांघरण्यासाठी पुरेशा प्रमाणात चादरी उपलब्ध आहेत का ? याचीही त्यांनी खातरजमा केली.
सध्या कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात पडलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक व एनजीओ यांना उपायुक्त संजय जाधव यांनी आवाहन केले आहे. रात्रीचे वेळी रस्ते, फूटपाथ, उघड्यावर झोपलेली एखादी बेघर व्यक्ती आढळून आल्यास यासंदर्भात त्वरित महापालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधावा.