

कल्याण : सरकारने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सेवा हक्क कायदा लागू केला असतानाही एका पित्याला आपल्या मुलाच्या जन्म दाखल्यासाठी अडीच वर्षांपासून चकरा मारण्यासाठी वन वन फिरण्याची नामुष्की ओढवली आहे. आजतागायत या दाखल्यासाठी ज्या रुग्णालयात मुलाचा जन्म झाला व जन्म झाल्याची नोंद ठेवणार्या पालिका प्रशासनाने साधी दखल ही न घेतल्याने सुनावणी झालेली नाही. त्यामुळे रुग्णालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पोलिस प्रशासनाला आंदोलनाचे पत्र दिल्यानंतर आटाळी, आंबिवली येथील रहिवासी चंदन प्रेमचंद मिश्रा यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात माझे बालक अक्षतचा जन्म झाला, मात्र रुग्णालय प्रशासनाने मुलाच्या जन्माची नोंद केडीएमसीकडे पाठवली नाही. मुलाचा जन्म दाखला घेण्यासाठी चंदन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात गेले असता, रुग्णालय प्रशासनाने मुलाच्या जन्माची नोंदनी केडीएमसी प्रशासनाला पाठवली नसल्याचे समोर आले. जन्म दाखल्यासाठी चंदन गेल्या अडीच वर्षांपासून महापालिका आणि श्रीदेवी हॉस्पिटलच्या फेर्या मारत आहेत.
चंदन मिश्रा म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून मुलाच्या जन्माच्या दाखल्यासाठी चकरा मारत आहोत, मात्र आजतागायत कोणतीही सुनावणी झाली नाही. त्यामुळे आठवडाभरानंतर रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत आज कल्याण महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाला पत्र देणे भाग पडले. याबाबत श्रीदेवी रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी संदीप लहामगे यांनी सांगितले की, सरकारने जन्म-मृत्यूचे काम बंद केले आहे. रुग्णालय प्रशासनाने वकिलामार्फत प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही संबंधित व्यक्तीला कळवले आहे, थोडा वेळ लागू शकतो.