

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या ७ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्याचे जाहीर केले आहे. ८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केडीएमसीचा ४२ वा वर्धापन दिन बुधवारी १ ऑक्टोबर रोजी असला तरी महापालिकेतर्फे मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी संपन्न करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी भयभीत कल्याण-डोंबिवलीतील करदात्यांची अस्वस्थ मनःस्थिती एक्स पोस्टद्वारे मांडली आहे.
महाराष्ट्रात संगणक प्रणालीचा वापर करण्याची छाती पिटणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने लाचखोरीचे टोक गाठले आहे. रस्तोरस्ती अपघात, इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटनांत बळी जात आहेत. सर्पदंशाने निरागसांना जीव गमावावा लागत आहे. आतापर्यंत ४७ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच विरोधी पोलिसांनी तुरूंगाचा रस्ता दाखवला आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी ठरलेल्या या महापालिकेकडून करदात्यांनी अपेक्षा काय करणार ? केडी’यम’सीच्या ४२ वर्षांचा काळा अध्याय राजू पाटील यांनी सचित्र पोस्टद्वारे मांडला आहे. या चित्रात खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची छबी दिसत आहे.
काळा दिवस का पाळावा ?
१९८३ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना झाली, पण ४२ वर्षांनंतरही शहरातील नागरिक मूलभूत गरजा, सोयी आणि सुविधांसाठी तडफडत आहेत. केडी’यम’सीच्या या भोंगळ, बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभारामुळे वर्धापनदिन हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळावा, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सर्वाधिक भ्रष्ट अधिकारी पकडले जाणाऱ्या महाराष्ट्रातील या एकमेव महानगरपालिकेवर बदनामीची नामुष्की ओढवली आहे.
काळ बदलला...आता परिस्थिती बदलण्याची वेळ
दुर्घटना, अपघातांची शृंखला प्रयत्न करुनही तुटत नाही. रस्तोरस्ती रक्ताचे पाट वाहत आहेत, इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून निरपराधांचे बळी जात आहेत. शवविच्छेदन गृहांत प्रेतांचा खच पडत आहे. त्यातच नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये दोन दिवसांतच लागोपाठ सहा निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या केडी’यम’सी प्रशासनासाठी याहून अधिक लाजिरवाणे काय आहे ? असा सवाल राजू पाटील यांनी या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. लोकसंख्या पाहता २७ गावे याच केडी’यम’सीत असूनही रस्ते, पाणी, आरोग्य, आदी मूलभूत गरजा, सोयी आणि सुविधांचा बोजवारा उडाला आहे. भ्रष्ट अधिकारी व सत्ताधाऱ्यांमुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. म्हणूनच महसूल घटून दिवाळखोरीत गेल्याने या केडी’यम’सीला महाभिकारी महापालिका म्हटले तर वावगे ठरणार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महानगरपालिकेचे विभाजन करून जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन उभे करणे हा आता एकमेव उपाय राहिला आहे. कल्याण-डोंबिवलीतील करदात्या नागरिकांनो आता खरंच वेळ आल्याची भावनिक साद राजू पाटील यांनी या पोस्टच्या माध्यमातून घातली आहे.
कल्याण-डोंबिवलीकर नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भ्रष्टाचाराची बजबजपुरी ठरलेल्या केडी’यम’सीतील अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीत अर्धशतक झळकावून रेकॉर्ड ब्रेक करण्याची तयारीला लागले आहेत का ? असा सवाल कल्याण-डोंबिवलीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या भ्रष्ट प्रशासनाला त्यांची जागा दाखवत, त्यांना जाब विचारण्याची आणि या भोंगळ कारभारा विरोधात आवाज उठविण्याची आता वेळ आली असल्याचे आवाहन राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीतील करदात्या नागरिकांना केले आहे. जर आताही आपण शांत बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्यांनाही या केडी’यम’सीचा हा काळा अध्याय यापेक्षाही भयानक पद्धतीने भोगावा लागेल, असेजी भाकीत राजू पाटील यांनी या पोस्टद्वारे वर्तविले आहे. या पोस्टला लाईक करणाऱ्यांसह पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे.