

डोंबिवली (ठाणे) : उन्हाळा-पावसाळा-हिवाळा असो वा कोणताही ऋतू असो, दुर्घटना सांगून येत नसतात. त्यासाठी शासकीय व निमशासकीय यंत्रणा सज्ज असायला हवी. हाच धागा पकडून डोंबिवली मेडिकल फाऊंडेशन ऑफ आयएमएच्या अंतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीच्या लाईफ सेव्हर्स कमिटीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वैद्यकिय आरोग्य विभाग आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज झाला आहे.
केडीएमसीच्या वैद्यकीय आणि पॅरामेडिकल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी डोंबिवली जिमखान्यात आयएमए डोंबिवलीचे पेट्रन डॉ. मंगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्री-हॉस्पिटल ट्रॉमा लाईफ सपोर्ट या प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून वैद्यकीय तज्ज्ञांची मदत येईपर्यंत अपघातग्रस्त अथवा जखमींना मदत कशी करावी, या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
अपघातग्रस्त रूग्णाच्या जखमेचे मूल्यमापन आणि तीव्रतेची ओळख कशी करावी, ट्रायाजिंग (प्राथमिकतेनुसार रूग्णांचे वर्गीकरण), प्राथमिक उपचार आणि त्यानंतर रूग्णाचे उच्च उपचार केंद्रात सुरक्षित स्थलांतर कसे करावे, याचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. गोल्डन आवरमध्ये तातडीचे उपचार मिळाल्यास मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येणे शक्य होते, याचे प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मिळाले.
केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोएल, उपायुक्त प्रसाद बोरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिपा शुक्ल यांच्यासह इतर अधिकारी देखिल या कार्यशाळेत सहभागी झाले होते. जवळपास २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. प्रशिक्षणादरम्यान आयएमए डोंबिवलीचे पेट्रन डॉ. मंगेश पाटे, अध्यक्ष डॉ. विजय चिंचोले, सचिव आणि लाईफसेव्हर्स कमिटी चेयरपर्सन डॉ. अर्चना पाटे, उपाध्यक्ष डॉ. नीती उपासनी, सहकोषाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, डॉ. सुनित उपासनी, डॉ. भक्ति लोटे यांच्यासह इतर डॉक्टर्स उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, समुदायाच्या आरोग्यसेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसोबत आरोग्यविषयक सकारात्मक उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनची डोंबिवली शाखा सदैव तत्पर आणि कटिबद्ध असते.
डॉ. मंगेश पाटे, आयएमए पेट्रन