

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या सुवर्णा अविनाश सरोदे या २६ वर्षीय महिलेचा सिझेरियन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती कल्याणातही झाल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांतून दिसून येते. शक्तीधाम रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवतीचा मृत्यू आयसीयूचा अभाव आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केल्याने वैद्यकीय विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कल्याणात डोंबिवलीची पुनरावृत्ती ?
केडीएमसीच्या शक्तीधाम रूग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू
प्रसूतीगृहात उपचारादरम्यान गर्भवती दगावली
आयसीयूचा अभाव आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत
कुटुंबियांच्या आरोपांमुळे वैद्यकीय विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
शांतीदेवी अखिलेश मौर्य (३०) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. शांतीदेवीचा मृत्यू रूग्णालयात आयसीयू नसल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला असला तरी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी मौर्य या महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली होती. तिला इंजेक्शन देण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने प्रसूतीगृहातून खासगी रूग्णालयात नेत असताना शांतीदेवीचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूतीगृह असलेल्या या रूग्णालयात आयसीयूची व्यवस्था नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे केडीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेने सेवेतून कमी करून त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच या घटनेची पुनरावृत्ती घडली असल्याने वैद्यकीय आरोग्य विभाग अडचणीत आला आहे.