KDMC News | डोंबिवली एमआयडीसीतील वृक्षवल्लीच्या संरक्षणासाठी केडीएमसी सज्ज
डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील वृक्षवल्ली सुरक्षित राहण्याकरिता सुदर्शन नगर, मिलाप नगर व इतर अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटणे, तसेच विस्तार कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे.
महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम निश्चित केल्यानंतर केडीएमसीकडून कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक जाधव यांनी कळविले आहे. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या पत्राला अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसीच्या निवासी विभागातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या वाढीव फांद्या, तसेच झाडांचा विस्तार कमी करण्याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सतत पत्रव्यवहार करत असतात. नुकत्याच एमआयडीसी परिसरातील झाडाची फांदी पडून झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने या भागातील सर्व झाडांची छाटणी करणे अनिवार्य आहे. परिसरातील रस्त्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले असता अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जात असल्याचे निदर्शनास येते.
झाडांच्या फांद्याची छाटणी कामाला प्रारंभ कधी करणार ?
झाडाच्या फांद्या छाटणे किंवा विस्तार कमी करण्यासाठी विद्युत वाहिनीचा प्रवाह खंडित करणे आवश्यक आहे. विद्युत प्रवाह खंडित करून मिळाल्यास झाडांची छाटणी करण्यासह विस्तार करणे ही कामे पावसाळ्यापूर्वी करणे सोयीचे होईल. त्यामुळे या बाबीचा गांभिर्यपूर्वक विचार करून उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतील विद्युत प्रवाह खंडित करण्या संदर्भात महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन, वृक्ष अधिकारी संजय जाधव यांनी महावितरणला केले आहे. हा पत्रव्यवहार १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे. तथापी अद्याप या संदर्भात महावितरणकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे झाडांच्या फांद्याची छाटणी कामाला प्रारंभ कधी करणार ? असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
धोकादायक झाड कोसळून पथदिव्याचा पोल तुटला
निवासी विभागातील मिलापनगरमध्ये असलेल्या सेंट जोसेफ शाळेजवळ गुरूवारी दुपारी गुलमोहराचे झाड तोडताना ते पथदीव्यावर पडल्याने पोल तुटला. या गुलमोहराच्या धोकादायक झाडाबद्दल तक्रार देण्यात आली होती. निवासी विभागामध्ये एकूण 33 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यात गुलमोहराच्या झाडांचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यापूर्वी ही झाडे तोडणे गरजेचे आहे. काही झाडे व त्याच्या फांद्या या महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनी जवळ आहेत. महावितरणकडून शटडाऊन मिळाल्यानंतर ही झाडे तोडण्यात येतील. तसे पत्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून 17 फेब्रुवारी रोजी देण्यात आले आहे. अद्याप महावितरणकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.

