

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख भगवान पाटील याची खाबुगिरी कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडियो समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा कर्मचारी यापूर्वी डोंबिवलीच्या 'फ' प्रभागात फेरीवाला हटाव पथकामध्ये कार्यरत असताना त्यावेळीही त्याच्यावर फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कल्याणातही फेरीवाल्यांना संरक्षण देण्यासाठी एकाकडून प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पैसे स्वीकारत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडियोची केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी या पार्श्वभूमीवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
केडीएमसीच्या जे प्रभागात भगवान पाटील हा फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. या प्रभागाच्या हद्दीतील फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तथापी कुंपणच शेत खात असल्याचे पथक प्रमुख भगवान पाटील याच्या खाबुगिरीतून अधोरेखित झाले आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्याच्या मोबाईलमार्फत व्हिडियो रेकॉर्डिंग सुरू केले. जे प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हाच भगवान पाटील दुचाकीस्वाराकडून फेरीवाल्यांना संरक्षण देऊन जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या कामासाठी पैसे स्वीकारत असल्याचे दिसत आहे. जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यामुळे हप्ता कमी पडत असल्याने आपण दिलेल्या रकमेत पंधराशे रूपये टाकल्याचे दुचाकीस्वार बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडियो समाज माध्यमांवर प्रसारित होताच आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. व्हिडियोमध्ये कर्मचारी भगवान पाटील हे काही आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी भगवान पाटील यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. खुलाशातील त्यांचे मत पाहून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
भगवान पाटील यापूर्वी डोंबिवलीतील फ प्रभागात फेरीवाला हटाव पथकात कार्यरत होता. त्यावेळीही त्याच्यावर फेरीवाल्यांना संरक्षण देण्याचा आरोप करणाऱ्या असंख्य तक्रारी वरिष्ठांपर्यंत जात होत्या. मात्र तत्कालीन वरिष्ठ देखिल त्याला पाठीशी घालत असल्याच्या देखिल तक्रारी वाढल्या होत्या. फेरीवाल्यांचे उच्चाटन करण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य वाढविणारा हा कर्मचारी एक-दोनदा अडचणीत आला होता. मात्र त्यावेळी तो कारवाईच्या कचाट्यातून थोडक्यात बचावला असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.
माजी वजनदार नगरसेवकांच्या मर्जीतले असल्याच्या अविर्भावात वावरणारा हा कर्मचारी फेरीवाला हटाव पथकात सामावून घेण्यासाठी वरिष्ठांकडे धडपडत असायचा, अशी केडीएमसी वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी नगरसेवकांचा खास माणूस असल्याच्या बतावण्या करणारा हा कर्मचारी फेरीवाल्यांकडून पैसे स्वीकारत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून आल्याने त्याच्यावर मेहेरबानी न करता आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खाबुगिरीचा शाप लागला आहे. गेल्या 30 वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण 128 अधिकारी व कर्मचारी खाबुगिरीच्या प्रकरणांत सापडले आहेत. तर लाचविरोधी पथकाने 31 जानेवारी रोजी रंगेहाथ पकडलेला बाजार परवाना विभागातील लिपीक प्रशांत धिवर हा 44 वा आरोपी मानला जातो. गेल्याच वर्षी डोंबिवलीच्या ह प्रभागात मालमत्ता कर विभागातील योगेश महाले आणि सूर्यभान कर्डक हे दोघे कर्मचारी 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पथकाने पकडले होते.