

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत फोफावलेल्या बेकायदा बांधकामांना जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत असतानाच आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची सुरूवात महागणपतीच्या टिटवाळ्यापासून केली आहे. मांडा-टिटवाळा 'अ' प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी 'अ' प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना पालिका सेवेतून सोमवारी निलंबित केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून रोकडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. 'अ' प्रभाग हद्दीतील मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्णी, वासुंद्री परिसरात बेसुमार बेकायदा चाळी सुरू होत्या. टिटवाळ्यातील बाह्य वळण रस्त्याच्या पाहणीसाठी आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड टिटवाळ्यात आल्या होत्या. त्यावेळी परिसरातील बेकायदा चाळींची बजबजपुरी पाहून आयुक्तांनी तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि या कारवाईत हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईची तंबी दिली होती. आयुक्तांनी आदेश देऊनही रोकडे यांनी जुजुबी कारवाई करण्याव्यतिरिक्त टिटवाळा परिसरातील एकाही बेकायदा बांधकामांवर आक्रमक कारवाई केली नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या माध्यमातून केडीएमसीला आदेश दिले आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी वारंवार आदेश देऊनही, नोटिसीद्वारे सूचित करूनही आपण अ प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखली नाहीत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने सहाय्यक आयुक्त रोकडे यांना सेवेतून निलंबित केले.
'अ' प्रभागातील बेकायदा बांधकामे नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने उद्विग्न झालेल्या आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी गेल्या महिन्यात संदीप रोकडे यांची 'अ' प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करून तेथे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची नियुक्ती केली. पदभार स्वीकारल्यापासून सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या 25 दिवसांच्या कालावधीत टिटवाळा परिसरातील सुमारे 800 हून अधिक चाळी, गाळे, इमारतींची बांधकामे जमीनदोस्त केली. पाटील यांनी अल्पावधीत बेकायदा बांधकामे भुईसापट केली. यापुढेही त्यांची बेकायदा बांधकामांविरुद्धची मोहीम जोरदार सुरू आहे. हे काम रोकडे यांनी का केले नाही, असे प्रश्न आता प्रशासनात उपस्थित केले जात आहेत.
मागील काही वर्षांत ज्या प्रभागांमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले तेथील बेकायदा बांधकामांना नोटिसा देण्याव्यतिरिक्त रोकडे यांनी कधीही ती बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई केली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. रोकडे हे शासन मान्यताप्राप्त पालिकेतील सहाय्यक आयुक्त आहेत. ते उपायुक्त पदाचे दावेदार मानले जात होते.
'अ' प्रभागातील अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई करण्यात कसूर केल्याने आणि वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन आणि कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याने महापालिका अधिनियमातील कलम 56 (1) (ब) कलमाने संदीप रोकडे यांना महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.