

डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्वेकडे स्कायवॉक खालच्या रस्ता दुभाजकाला बेवडा कट्टा नाव पडले होते. आता याच बेवडा कट्ट्यावर वृक्षारोपण करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठ्या कौशल्याने दारूड्यांची नाकेबंदी करून टाकली आहे.
केडीएमसीच्या रणरागिणी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी चाणाक्ष बुद्धीने निर्णय घेऊन नशामुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील स्कायवॉक खाली रात्रीस खेळ चाले...अशी पूर्वी परिस्थिती होती. त्यानंतर दिवसाढवळ्या देखिल स्कायवॉक खाली असलेल्या रस्ता दुभाजकावर बसून चाखण्यासोबत दारूच्या बाटल्या रित्या होऊ लागल्या. सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या या बेवडा कट्ट्याने परिसराला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले होते. हजारो चाकरमानी सकाळी लोकल पकडण्यासाठी, तसेच संध्याकाळी स्टेशनवर उतरून घर गाठण्याकरिता या रस्त्यावरून ये-जा करत असतात. शिवाय बाजारहाट करण्यासाठी गृहिणी देखिल या रस्त्याने ये-जा करत असतात. या कट्ट्यावर बसून दारू ढोसणाऱ्यांमुळे पादचाऱ्यांना ओशाळल्यागत व्हायचे.
दररोज सायंकाळी सातनंतर उशिरापर्यंत ओल्या पार्ट्यांना ऊत येत असे. याच स्कायवॉक खाली उकडलेली अंडी, ऑम्लेट-भुर्जी-पाव, भजी-वडा-पाव, चायनिजचे ठेले असल्याने दारूड्यांना चाखणा आणि इतर खाण्याच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. त्यामुळे या कट्ट्याला सार्वजनिक दारूच्या अड्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही काही केल्या बेवडा कट्टा बंद होत नव्हता. केडीएमसी प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करूनही या कट्ट्यावर दारूची बाटली आडवी झाली नाही. अखेर सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी शक्कल लढवत या कट्ट्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाची अंमलबजावणी करताना या कट्ट्यावर वृक्षारोपण करून दारूड्यांना बसण्याची जागा बंद करून टाकली. विशेष म्हणजे कट्ट्यावर लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी येथील दुकानदारांनी घेतल्याचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले. एकीकडे नशामुक्तीसाठी पाऊल उचलणाऱ्या केडीएमसीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे डोंबिवलीकरांसह पर्यावरणप्रेमींनीही कौतुक केले. तर दुसरीकडे कट्टा बंद झाल्याने दारूड्यांची गैरसोय होणार आहे.
स्कायवॉक खालच्या कट्ट्या खेरीज अन्य ठिकाणे शोधणाऱ्या दारूड्यांनी बाजी प्रभू चौकातील जुन्या एसटी स्टँडची जागा निश्चित केल्याचे दिसून येते. स्टँडच्या मोकळ्या जागेत लावलेल्या रिक्षांत बसून दारूडे आपला कार्यभाग उरकताना दिसून येतात. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्यास हा अड्डा देखिल बंद होऊ शकतो, याकडे दक्ष नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांद्वारे लक्ष वेधले आहे.