KDMC | केडीएमसीची करवसुली थंडावल्याने पालिका प्रशासन अलर्ट

चार महिन्यात चारशे कोटीहून अधिक करवसुलीसाठी करावी लागणार तारेवरची कसरत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाpudhari file photo
Published on
Updated on

कल्याण : सतीश तांबे

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला कररुपी मिळणार्‍या महसूलाव्यतिरीक्त कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने पालिकेची सर्व भिस्त ही मुख्यतः मालमत्ता कर वसुलीवर आहे. मागील चार महिन्या पासून शासनाच्या विविध योजना, विधानसभा निवडणुका आदी कामा मध्ये कर विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचा परिणाम कर वसुलीवर होऊन कर वसली जवळपास ठप्प झाली. अवघ्या चार महिन्यात मालमत्ता कर वसुली नव्वद कोटी रुपये पार करू शकली नसल्याने पालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघ्या चार महिन्यांचा कालावधी उरला असून या चार महिन्यात अंदाजे चारशे कोटीहुन अधिक रुपयांची कर वसुली करावी लागणार असल्याने कर वसुलीचे उद्दिष्टे पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

कर वसुलीची विस्कळित झालेली आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. कर वसुलीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी तात्पुरती सवलत दिली असून त्याने पुढील नववर्षात करवसुली धडकपणे राबविण्यासाठी मालमत्ता सिल करणे, जप्ती, लिलाव प्रक्रिया आदी कठोर कारवाई राबविणार असल्याने अ‍ॅक्शन मोडवर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत हे मालमत्ता कर व नगर रचना विभागाकडून मिळणार्‍या बांधकाम परवानगी शुल्कातून मिळणार्‍या कर रुपी महसुलातून आहे. या दोन्ही विभागातून कर रुपी जमणार्‍या पैशातून पालिकेच्या कर्मचार्‍यांचा पगार व शहरातील विकास कामावर खर्च केला जातो. गेल्या दिड वर्षात पालिका क्षेत्रात राज्य शासन व केंद्र सरकारने विविध प्रकल्प व विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने पालिकेच्या निधीतून केल्या जाणार्‍या विकास कामावर होणार्‍या आर्थिक खर्चाचा मोठ्या प्रमाणावर ताण कमी झाला होता. पालिकीची भिस्त ही मालमत्ता कराच्या करवसुलीवर असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये पालिका प्रशासनाने करविभागाला अंदाजे सव्वा सहाशे सहाशे कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल ते जुलै या चार महिण्याच्या कालावधीत मालमत्ता कर 121 कोटी जमा झाला होता त्या नंतर मात्र पुढील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सण, उत्सव, शासनाच्या विविध योजना राबविणे तसेच विधानसभा निवडणुका आदी कामात व्यस्त असल्याने पालिकेचे कर वसुली कमालीची थंडावली होती. या चार महिन्यात मालमत्ता कर वसूल 97 कोटी झाल्याने ती शंभरी ही पार करू शकली नाही. मागील आठ महिन्याच्या कालावधीत अवघ्या 218 कोटी रुपये मालमत्ता वसुली करण्यात कर विभागाला धन्यता मानावी लागली आहे.त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणिते बिघडली असून पालिकेच्या बजेट मध्ये कर विभागाला दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ठ गाठताना कर विभागाला नाकी नऊ येणार आहेत.

थकीत कराची वसुली न झाल्यास मालमत्तांचा जाहिर लिलाव

मालमत्ताधारकांना आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाही कराची रक्कम 31 डिसेंबर, 2024 पुर्वी भरल्यास 4 टक्के सवलत व ऑनलाईन 2 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्या नंतर कर वसुली प्रभावी पणे राबविली जाणार असून या मध्ये थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर थकीत रक्कमेवर दर महिन्याला 2 टक्के रक्कमेची दंडात्मक कारवाई करणे, नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे यासारखी कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतर थकीत कराची वसुली न झाल्यास मालमत्तांचा जाहिर लिलाव करुन त्याव्दारे थकीत कराची वसुली करण्यात येणार आहेर. तसेच करवसुलीच्या कामात दिरंगाई करणार्‍या कर्मचार्‍यावर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार असल्याची माहिती कर विभागाकडून मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news