

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महापालिका हद्दीतील चिकन मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान सुरू करून निषेध करण्यात येईल, असा इशारा हिंदु खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी दिला आहे.
कत्तलखान्यांसह मटण, चिकन, मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेवण्याच्या केडीएमसीच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील मटण, मांस विक्रेते आक्रमक झाले आहेत.
असले निर्णय घेण्यापेक्षा रस्ते सुधारावेत
अशाप्रकारचा निर्णय घेण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारावी. कल्याण रेल्वे स्थानक भागातील वाहतूक कोंडीमुळे सारेच हैराण आहेत. अशा महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकार्यांनी मेहनत घ्यावी. तेथे चांगले काम करावे. कत्तलखाने आणि मांस/मटण विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेऊन प्रशासनाला काय मिळणार आहे ? त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटण विक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाचा खाटिक समाजातर्फे निषेध केला जाईल, असा इशारा लासुरे यांनी दिला आहे.