KDMC | केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाची ओली पार्टी: मद्याचा अंमल चढल्यावर बिलावरुन शाब्दिक राडा!

म्होरक्यासह कर्मचाऱ्यांत वाद, पोलिसांनी हस्तक्षेप करताच उतरली झिंग
केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाची रंगेल पार्टी
केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाची रंगेल पार्टी
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाची ओली पार्टी समाज माध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे. पूर्वेकडील ९० फुटी रोडला असलेल्या एका नामचीन ढाब्यावर रंगलेल्या या पार्टीनंतर बिल कोण भरणार ? या वादातून आपसात चांगलाच शाब्दिक राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, अखेर पोलिसांना घटनास्थळी जाऊन हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना पाहताच दारूचा अंमल चढलेल्या कर्मचाऱ्यांची खर्रकन् उतरली. या पार्टीची नेटकऱ्यांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे.

   या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ४/जे प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकातील म्होरक्यासह काही कर्मचारी मंगळवारी रात्री उशिरा एका ढाब्यावर पार्टीसाठी जमले होते. ओल्या पार्टीची यथेच्छ मज्जा घेतल्यानंतर बिल भरण्याच्या मुद्द्यावरून पथकातील कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार वादावादी सुरू झाली. कुणीही बिल देण्यास तयार नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाने आधी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढत गेल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हॉटेल मालकाने पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांना पाहताच नशा उतरली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ ढाब्याबाहेर दाखल झाले. पोलिसांना पाहताच मद्याचा अंमल चढलेल्या कर्मचाऱ्यांची खर्रकन् उतरली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत केले आणि वादावर पडदा टाकला. रात्रीच्या सुमारास ढाब्याबाहेर पोलिसांनी पथकातील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. हे पाहून ढाब्यावर जमलेल्या अन्य ग्राहकांचीही झिंग उतरली. 

कल्याण-डोंबिवलीकरांकडून संताप

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करणारे पथकच जर अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी वाद घालत असेल तर सामान्यांनी कुणाकडे पहायचे ? असा सवाल उपस्थित होत आहे. सार्वजनिक ठिकाणी जबाबदार पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या म्होरक्याचे वर्तन शोभणारे नसल्याची प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवलीकरांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news