KDMC standing committee election : केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेला मिळाला मुहूर्त, १६ मार्चला होणार स्थायी समिती सदस्यांची निवड

KDMC politics : सभापतीपद मिळविण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच
KDMC
KDMCPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवारी १६ मार्चला केडीएमसीची सर्वसाधारण सभा होणार आहे. एकीकडे या सभेत स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती, शिक्षण या समित्यांवर नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे या समित्यांवर कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर दुसरीकडे केडीएमसी तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष इच्छुक असून सभापती पद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर निवड देखील झाली. मात्र महापौर निवड होऊन सुद्धा सर्वसाधारण सभा लागली नव्हती. मनसे आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्ते शिवसेना उद्धव बबाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. मात्र ठाकरे गटातून निवडून येऊन देखील कोकण विभागीय आयुक्तांकडे शिवसेना ठाकरे गटात या तीन नगरसेवकांनी नोंदणी न केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावर तोडगा कसा काढावा यासाठी केडीएमसीची बहुचर्चित सर्वसाधारण सभा लांबली होती. अखेर या सभेला मुहूर्त मिळाला असून १६ मार्चला सकाळी ११ वाजता ही सर्वसाधारण सभा होणार असल्याचे परिपत्रक केडीएमसी सचिव किशोर शेळके यांनी काढले आहे.

यंदाच्या नालेसफाईसाठी ४.३० कोटींची तरतूद

या सभेत केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या पालिका सदस्यांपैकी १६ व्यक्तींची स्थायी समिती सदस्य पदावर नियुक्ती करणे, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीमध्ये सदस्यांपैकी ११ सदस्यांची नियुक्ती करणे. शिक्षण समितीमध्ये पालिका सदस्यांपैकी ११ सदस्यांची नियुक्ती करणे. सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता मालमत्ता कराचे दर ठरविणे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील मोठ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी, तसेच पावसाळ्यानंतर सफाई करणे यासाठी लागणाऱ्या ४ कोटी २९ लाख ९२ हजार १५७ रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे.

रस्त्यांसाठी ३४.३६ कोटींची तरतूद

कल्याण-डोंबिवली विभागातील रस्त्यांची देखभाल/दुरूस्ती करण्यासाठी ३४ कोटी ३६ लाख ८२ हजार रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देणे. उल्हास नदीस मिळणाऱ्या गाळेगांव व मोहने नाल्यामधील सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ६ कोटी ४७ लाख १४ हजार १०५ रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देणे, आदी विषय घेण्यात येणार आहे. याचसोबत इतर पालिका सदस्यांनी मांडलेले विषय देखील घेण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news