

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर परिमंडळ–३ (कल्याण) अंतर्गत कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने व्यापक आणि कडेकोट बंदोबस्ताची अंमलबजावणी केली आहे. कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी विविध प्रतिबंधात्मक कारवाईच्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
या संदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, आदी अधिकारी उपस्थित होते. कल्याण परिमंडळ – ३ अंतर्गत एकूण ३१ प्रभागांमध्ये ३४४ मतदान केंद्रे आणि १ हजार ४५७ मतदान बूथ निश्चित करण्यात आले आहेत. याठिकाणी मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, VST, FST आणि ९ SST पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिस ठाण्यांतर्गत ४९ विशेष पोलिस सेक्टर तयार करण्यात आले आहेत. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ९ SST ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये कल्याणच्या महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी आणि खडकपाडा, तर डोंबिवलीत रामनगर (डोंबिवली), विष्णूनगर, मानपाडा आणि टिळकनगर अशा ८ पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ४९ पोलिस सेक्टर तयार करण्यात आले असून त्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
शस्त्र जमा आणि प्रतिबंधक कारवाई
निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शस्त्र जमा करण्यात आली आहेत. बँक आणि इतर संस्थांकडील शस्त्रांसह एकूण १ हजार ३०१ शस्त्रांपैकी १ हजार ११० शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ५५, ५६, ५७, मकोका, एमपीडीए, तसेच विविध भा. ना. सु. सं. कलमांतर्गत एकूण २ हजार ५२७ प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत.
९ लाखांची रोख रक्कम जप्त
अवैध दारू, अमली पदार्थ, शस्त्रे यांच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गावठी कट्टे, काडतूसे, दारू, गांजा, तसेच SST कारवाईदरम्यान ९ लाख रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोम्बिंग ऑपरेशन आणि ड्रोनद्वारे पाळत
निवडणूक काळात ४ कोम्बिंग ऑपरेशन, ९ रूट मार्च आणि ७ दंगा नियंत्रण योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण परिमंडळात २४ ड्रोनच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
EVM सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मुख्य स्ट्रॉंगरूम १ आणि आरओ स्तरावरील ९ स्ट्रॉंगरूम, अशा एकूण १० स्ट्रॉंगरूम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे पोलिस प्रशासनाने आवाहन केले आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन डीसीपी अतुल झेंडे यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचेही डीसीपी झेंडे यांनी केले.