

डोंबिवली : रविवारी रात्रीच्या सुमारास काटई-बदलापूर पाईपलाईन मार्गावर असलेला दिशादर्शक फलक अचानक कोसळला. या दुर्घटनेतून दुचाकीस्वार बालंबाल बचावला. मात्र या घटनेची माहिती कळताच या भागाचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वाराची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.
रविवारी सायंकाळनंतर अचानक पावसाने हजेरी तसेच वादळी वार्याचा फटका काटई-बदलापूर पाईपलाईन मार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकाला बसला. या मार्गावरून वाहनांची वर्दळ नेहमीच असते. अचानक फलक कोसळल्याने त्या खालून जाणारा एक दुचाकीस्वार सुदैवाने बालंबाल बचावला.
दरम्यान फलकाच्या खाली सापडलेल्या दुचाकीस्वाराला बाहेर काढून राजू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयाकडे हलविले. जखमी दुचाकीस्वारावर तरत्काळ उपचार सुरू केल्याने त्याची प्रकृती धोक्याबाहेर गेल्याचे रूग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. तर या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना राजू पाटील यांनी दिल्या.
दुर्घटनांची पुनरावृत्ती थांबणार कधी?
याच दरम्यान मनसेचे नेते राजू पाटील यांनी शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. चार वर्षांपूर्वी मेच्या दुसर्या आठवड्यात तौत्के चक्रीवादळाच्या वार्यांमुळे कल्याण-शिळ महामार्गावर अवघ्या काही तासांमध्ये तीन ठिकाणी मोठे होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या.
पहिल्या घटनेत एका पिकअपवर मोठे होर्डिंग कोसळले. तर दुसरी घटना कल्याण जवळच्या मेट्रो मॉलसमोर, तिसरी घटना पलावा मॉलसमोरच्या रस्त्यावर होर्डिंग कोसळले. या तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये सात-आठ जण गंभीर जखमी झाल्याची आठवण या निमित्ताने राजू पाटील यांनी सांगितली.