

मिरा रोड : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत बार मध्ये कैविटी रुम बनवून महिला सिंगर यांना लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत 22 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 12 मुलींची सुटका केली आहे.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील लता मंगेशकर नाटयगृहाजवळ असलेल्या टारझन आर्केस्ट्रा बार मध्ये असलेल्या महिला सिंगर यांना बारचे चालक व मालक तसेच हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, कॅशियर व वेटर यांनी नियमापेक्षा जास्त महीला सिंगर यांना आर्केस्ट्रा बार मधील कॅविटी रुममध्ये लपवुन ठेवलेले आहे. तसेच महिला सिंगर यांना अश्लील अंगविक्षेप करण्यास प्रोत्साहन देवुन ग्राहकांना आकर्षित करण्यास भाग पाडण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली.
या कारवाईमध्ये बारमधील उपस्थित महिला सिंगर या बारमध्ये अश्लील अंगविक्षेप करुन ग्राहकांना आकर्षित करत असताना आढळून आल्या तसेच बारमध्ये काम करणारे मॅनेजर, कॅशियर व वेटर हे प्रोत्साहन देत असल्याचे दिसुन आले. या कारवाईत आर्केस्ट्रा बारमधील कॅविटी रुम शोधण्यासाठी पेणकरपाडा अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून त्यांच्या मदतीने बार आस्थापनेची तपासणी केली असता बारमधील मेकअप रुमच्या भिंतीमध्ये छुपा काचेचा दरवाजा बनवुन एक केंवीटी रुम बनविला असल्याचे व त्यामध्ये 05 महीला सिंगर यांना लपवुन ठेवण्यात आल्याचे दिसुन आले.
त्यामधून महीला सिंगर यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बारची तपासणी केली असता किचन रुममध्ये देखील एक कॅविटी रुम बनविण्यात आलेली असल्याचे दिसुन आले. या दोन्ही कॅविटी रुमच्या दरवाजाचे लॉक हे इलेक्ट्रीक लॉक असल्याचे दिसुन आले.
आरोपींना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या कारवाई मध्ये आर्केस्ट्रा बारमधुन रोख रक्कम, दोन पैसे मोजण्याची मशीन व इतर मुद्देमाल असा मिळून 45,430 रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान ऑर्केस्ट्रा बारचे मालक, मॅनेजर, कॅशियर व वेटर अशा 22 आरोपी विरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 19 जणांना जामीन मिळाला आहे.
उर्वरित तिन आरोपी बार मालक रमण नारायण शेट्टी, रा. अंधेरी व सिद्धार्थ गोपाल शेट्टी, रा. भाईंदर पूर्व आणि कॅशियर मोहित चौरसिया, रा. विरार यांना रविवार 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या कारवाईच्या अनुषंगाने छुप्या खोल्या संदर्भात पोलिसांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि योगेश काळे हे करत आहेत.