

ठाणे : कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतजमीनीतील अडीच फुटाच्या खड्ड्यांमध्ये आढळलेल्या एका चिमुरडी आणि महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. त्या दोघी आते आणि मामी बहीण असल्याचं पोलिसांनी सांगितले तर दोघीही मुंब्रा येथे राहणाऱ्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान या दोघी कासारवडवलीतील शेत जमिनीत आल्या कशा याबाबत प्रश्नचिन्ह कासारवडवली पोलिसांसमोर आव्हान बनवून उभे आहे. या दोन्ही मृतदेहांची मिसिंगमध्ये मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतून कासारवडवलीत त्या दोघी आल्या कशा याचा तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत.
कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारवडवली परिसरातील लेबर कॉलनी जवळ आशिष पाटील यांच्या शेत जमिनीमधील सुमारे अडीच फूट खोल खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना, २ सप्टेंबर रोजी रात्री आढळून आले होते. त्या दोघींची ओळख पुढे आणण्याचे आव्हान कासारवडवली पोलिसांसमोर असल्याने त्यासाठी तीन ते चार पथके तयार करून ते पथके शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले होते. त्याचदरम्यान त्या दोघी मुंब्रा पोलिस ठाण्यातून मिसिंग असल्याची बाब पुढे आली. एकीचे नाव रुकसाना शेख (२४) आणि रहमत शेख (०४) असे नाव आहे.