

कसारा (ठाणे, शाम धुमाळ) : मुसळधार पावसामुळे शनिवारपासून (दि.27) सुरू असलेल्या कसारा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंबरमाळी, वाशाळा, लतीफवाडी भागातील भात व वरई शेती वाहून गेली असून रस्त्यांवर माती व दगडांचा मलबा आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
कसारा घाटातील जुना व नवा दोन्ही घाट मातीचा व दरडींचा मलबा कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जुना घाटातील जव्हार फाटा व झिरो पॉईंट तसेच नवा घाटातील बिवळवाडी वळण व ब्रेक फेल पॉईंटजवळ दरड कोसळून अडथळा निर्माण झाला. महामार्ग पोलिस व जेसीबीच्या मदतीने दोन तासांच्या परिश्रमानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
उंबरमाळी–फणसपाडा मार्गावरील रस्ता खचल्याने फणसपाडा व दापूर माळ गावांचा संपर्क तुटला. उंबरमाळी रेल्वे स्थानकाबाहेर पूरस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. कसारा गावातील नाल्यातील पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. सदस्य शाम धुमाळ, भारत धोंगडे, सुनील वाकचौरे, मनोज मोरे, विनोद आयरे, गणेश भांगरे, संदीप चिले, मयूर गुप्ता, निनाद तावडे, प्रसाद दोरे, अक्षय राठोड यांनी धोकादायक घरांमध्ये जाऊन मदतकार्य केले. कसारा पोलिस, वनविभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व महामार्ग पोलिस मदतकार्य करत आहेत.
दरम्यान, वारा व पावसामुळे आवरे गावात झाडे वीजवाहक तारा वर कोसळली. आपत्ती व्यवस्थापन सदस्य निलेश विशे, सरपंच सोमनाथ वाघ, शिवाजी विशे, प्रभू थोरात आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी झाडे बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत केला आहे.