

ठाणे : चांगले कर्म केले तर फळ उत्तम मिळते. पण आपणाकडून चांगलेे कर्म घडवायचे असेल तर काम, क्रोध, मत्सर यावर ताबा मिळवावा लागेल. आपल्या पूर्वजांनी उत्तम आंब्याची झाडे लावल्यामुळे त्याची फळे आपण चाखतो. पुढच्या पिढीचा हा केलेला विचार म्हणजे, अद्वैताचा विचार आहे. तो अंगिकारला पाहिजे, हा ज्ञानेश्वरीतला कर्मयोग ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव यांनी उलगडून सांगितला.
ज्ञानेश्वर सेवा मंडळ पाचपाखाडी येथे संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या दुसर्या दिवशी ज्ञानेश्वरीतील कर्मयोग या विषयावर कृष्णा जाधव यांनी विवेचन केले. यावेळी कार्यक्रमाला ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष अजित वामन मराठे, सचिव घोलप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दैनिक पुढारी आणि ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना कृष्णा जाधव म्हणाले, श्रेष्ठ कर्म म्हणजे काय, जे गर्वरहित आहे. जे निष्कलंक आहे, असे कर्म हे श्रेष्ठ कर्म आहे. महाभारतात एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, दान मी सुद्धा करतो, पण कर्णालाच दानशूर का म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, वेळ येताच मी सांगेन. एकदा श्रीकृष्णाने अखंड डोेंगर सोन्याचा केला आणि अर्जुनाला म्हणाला, या डोंगरातील सोने ज्याला तुला दान करायचे आहे त्याला कर. अर्जुनाने दवंडी पिटली दुसर्या दिवशी लाखो लोक जमा झाले. सैनिकांनी रांगा लावल्या. अर्जुनाने प्रत्येकाला झेपेल एवढे सोने दिले. अर्जुनाने स्वत:च्या हाताने असंख्य लोकांना दान केले.
अर्जून थकून गेला आणि कृष्णाला म्हणाला, मी सर्वार्ंना दान दिले आहे. श्रीकृष्ण म्हणाला, हरकत नाही. मग दुसर्या दिवशी श्रीकृष्णाने कर्णाला सांगितले. हा सोन्याचा डोंगर मी तुला दिला आहे. तो तू आता दान कर. मग कर्णाने सर्वत्र दवंडी दिली. लाखो लोक गोळा झाले. कर्ण सर्वांसमोर आला. सर्वांना खाली बसायला सांगितले. शांतपणे म्हणाला, श्रीकृष्णाने हा सोन्याचा डोंगर मला दिला आहे. तो मी तुम्हाला देतो. तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते घेऊ न जा. सर्व लोकांनी शांतपणे जे जे हवे ते पुढील कित्येक दिवस ते दान नेत राहिले. दोघांचेही कर्म तेच होते. एकाकडे स्वत:च्या हाताने देण्याचा गर्व होता. तर दुसर्याकडे देण्यातही सेवाभाव होता. म्हणून कर्णाचे दातृत्व हे श्रेष्ठ कर्म होतं हा विचार भगवंताने पट वून सांगितला.
कर्म करताना मी देतो आहे, हा अहंभाव असू नये. हा संदेश यातून दिला. श्रीकृष्णाने भगवद् गीतेतून जे सांगितलं, ते ज्ञानेश्वरांनी उलगडून दाखविलं. म्हणून ज्ञानेश्वरी जगातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. मानवी योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान देऊ न ठेवलं आहे, ते आत्मसात केले पाहिजे, हा संदेश यावेळी कृष्णा जाधव यांनी उलगडून सांगितला.
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म
विज्ञान आणि अध्यात्म यावर भाष्य करताना जाधव म्हणाले, आज विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म श्रेष्ठ, हा वाद आपण पाहतो. प्रत्यक्षात विज्ञान व अध्यात्म दोन्ही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. विज्ञानाने भौतिक साधने दिली, तर अध्यात्माने अंतर्मनाचा शोध घ्यायला लावले. अंतरिक्षक्ती स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. माणूस संसारात अडकून राहिल्यामुळे कुटुंबासाठी आणि इतरांसाठी जगतो; स्वतःसाठी जगणे राहून जाते. मन:शांती मिळवण्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. अध्यात्म त्याला स्वतःचा शोध घ्यायला भाग पाडते.
गीता हा धर्म नाही तर गीता हे तत्त्वज्ञान आहे. ती मानवाच्या मालकीची नाही तर ती विश्वाच्या मालकीची आहे. गीता, ज्ञानेश्वरी हे माणुसकीची शिकवण देणारे ग्रंथ आहेत.
ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव