

कल्याण : पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील पीडितेच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि. २८) भेट घेतली. यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड देखील उपस्थित होत्या. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. त्यानंतर काळजी करू नका, या प्रकरणातील आरोपीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती. आज (दि.26) आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यो दोघांनाही कल्याण येथे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विशाल गवळीला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या समोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपी आणि त्याच्या पत्नीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिस आरोपीला घेऊन ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचा थेट एन्काउंटर करा अशा तीव्र प्रतिक्रिया कल्याणकरांकडून येत आहेत.
23 डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला. दुसर्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्यानेच चिमुकलीची अत्याचार करुन अमानुष हत्या केली.