

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा सैतान विशाल गवळी आणि त्याची सहआरोपी पत्नी साक्षी या दोघांना पोलिसांनी कोठीडीची आठ दिवसांची मुदत संपल्याने गुरूवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावली.
या संदर्भात बालिकेच्या कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विशालसह पत्नी साक्षी हिच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तथापी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर विशालसह पत्नीची कोणतीही चौकशी शिल्लक नसल्याचा दावा केला. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी. तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणासारखे याही प्रकरणात विशालसह त्याच्या पत्नीला चकमकीत ठार मारले जाण्याची भीती व्यक्त केली. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आरोपी विशाल याला त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची मागणी देखिल वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. मात्र कायद्यात अशी कुठेही तरतूद नसल्याचे पीडित कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी हरकत घेऊन न्यायालयाला सांगितले.
याच दरम्यान विशालला न्यायालयीन कोठडी देण्यास पीडीत कुटुंबीयांच्या वकिलांनी विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून विशाल आणि साक्षी गवळी या दोघांना दोन दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावली. आरोपी विशाल गवळीचे वकील ॲड. संजय धनके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, विशालसह पत्नीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. आम्ही न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांना विशालचे सीमकार्ड, त्याने गटारात फेकून दिलेला मोबाईल, खाडीत फेकून दिलेली पिशवी, आदी या प्रकरणाशी संबंधित वस्तूंचा शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत बालिकेचे कपडे, तिचा मृतदेह फेकलेल्या कल्याण पूर्व ते बापगाव मार्गावारील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बदलापूर प्रकरणासारखा चकमकीचा प्रकार होऊ नये म्हणून विशाल पोलिस कोठडीत आहे, तोपर्यंत त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असू द्यावेत अशी मागणी केली. मात्र ही मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.
क्रूरकर्मा विशाल गवळी याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरूवारी हजर केले जाणार असल्याची माहिती समाज माध्यमांसह विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना मिळाली होती. कार्यकर्त्यांनी गुरूवारी सकाळपासून कल्याण न्यायालयासमोरील रस्त्यावर शांतेत मानवी साखळी केली होती. कार्यकर्त्यांच्या हातात असलेल्या फलकांवर विशाल गवळीला फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेश नेते नवीन सिंग, उपाध्यक्ष विनोद तिवारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मानवी साखळीत सहभागी झाले होते. कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाच्या आवारासह न्यायालयाच्या बाहेर देखिल तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.