Mobile SIM deactivation scam : मोबाईलचे सीमकार्ड बंद करून कल्याणमधील शिक्षिकेची 2 लाखांची फसवणूक

माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू
Mobile SIM deactivation scam
मोबाईलचे सीमकार्ड बंद करून कल्याणमधील शिक्षिकेची 2 लाखांची फसवणूकFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणारी शिक्षिका कल्याण पूर्वेकडे राहते. या शिक्षिकेच्या मोबाईलचे सीमकार्ड परस्पर बंद करून सदर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून सायबर क्राईम करणार्‍या बदमाशाने शिक्षिकेच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामधून टप्प्याने दोन लाख रूपये काढून घेऊन अपहार केला.

एकीकडे फसगत झालेल्या या शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे सायबर गुन्हे करणार्‍या बदमाशांनी नवा फंडा वापरायला सुरूवात केल्याचे या घटनेतून उजेडात आले आहे.

अनिता खाडे असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या कल्याण पूर्वेतील देवळेकरवाडी परिसरात कुटुंबीयांसह राहतात. ठाणे जिल्हा परिषदेच्या शहापूर तालुक्यातील खर्डी भागातील मुसळेचापाडा शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून नोकरी करतात. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास अनिता यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत जात होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलची वेळ पाहण्यासाठी त्यांनी मोबाईल पाहिला असता त्याला रेंज नव्हती. काही तांत्रिक कारण असेल म्हणून त्यांनी मोबाईल पर्समध्ये ठेवला. शाळेत गेल्यावर देखिल मोबाईलला रेंज नव्हती.

शाळेतून परतल्यानंतर त्यांनी खडकपाड्यातील जिओ कंपनीच्या गॅलरीत जाऊन मोबाईल दाखवला. मोबाईल हरविल्याची नोंद असल्याचे तेथील कर्मचार्‍याने सांगितले. आधारकार्ड क्रमांकावरून कर्मचार्‍याने मोबाईल पुन्हा चालू करून दिला. मोबाईल सुस्थितीत झाल्यानंतर मैत्रिणीला काही रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवायची होती म्हणून पेटीएम प सुरू केले असता अनिता यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामधून दोन दिवसांच्या कालावधीत आठ व्यवहारांच्या माध्यमातून 20 हजार, 30 हजार, 40 हजार, 9 हजार असे टप्प्याटप्प्याने एकूण दोन लाख रूपये अज्ञाताने काढून घेतल्याचे निदर्शनास आले. शिक्षिका अनिता खाडे यांनी तात्काळ बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून अज्ञाताने दोन लाख रूपये काढून घेतल्याचे सांगण्यात आले.

सायबर क्राईम करणार्‍या भामट्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर शिक्षिका अनिता खाडे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

बँक खात्यात पैसे ठेवणे धोकादायक

सायबर क्राईम करणारे बदमाश दुसर्‍याच्या मोबाईलमधील सीमकार्ड बंद करून परस्पर पैसे काढत असल्याचा नवा प्रकार आता उघडकीला आला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बँक खात्यात पैसे ठेवायचे की नाही, असा प्रश्न खातेदारांकडून विचारण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news