

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या सिद्धार्थ नगरकडून रेल्वे स्थानकाकडे जाणार्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे.
दरम्यान जागरूक नेटकर्यांनी स्कायवॉकवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचा व्हीडियो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर कचर्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे.
या स्कायवॉकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पादचारी, रेल्वे प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणार्या गृहिणींना नाक मुठीत धरून चालावे लागते. चोहोबाजूंनी थुंकलेल्या भिंती, कोपर्या-कोपर्यात कचर्याचे ढीग, दुर्गंधी आणि प्रचंड घाण, याचा सार्यांना त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.
स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडविणार्या या स्कायवॉककडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेला स्वच्छता कर, तर रेल्वे प्रशासनाला प्रवासाचे शुल्क भरूनही कुणालाही स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही. नेहमीप्रमाणे या भागाची जबाबदारी झटकणार्या संस्था एकमेकांकडे बोट दाखवणार आणि जनतेच्या सहनशीलतेचा फायदा घेत मोकळ्या होणार. दरम्यान प्रशासन जर हात झटकून मोकळे होणार असेल, तर करसंकलन बंद करावे आणि नागरिकांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करावी का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.