Kalyan Shil Road | कल्याण-शीळ मार्गावर 4 तास कोंडी
डोंबिवली : पलावा पुलामुळे यावर्षी रक्षाबंधनाला कल्याण-शीळ महामार्गावर अडकून पडणार नाही अशी आशा वाहनचालकांना होती. मात्र, सकाळपासूनच या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने यातून सुटका करण्यासाठी वाहनचालकांना चार ते पाच तास लागत होते.
यामुळे रक्षाबंधनाला बहिणीकडे निघालेले भाऊराय या कोंडीत अडकून पडले होते. दुपार झाली तरी सोनारपाडा, मानपाडा, काटई, पलावा चौक, खिडकाळी, देसाई गाव, काटई बदलापूर रस्त्यावर अडकून पडली होती. काटई ते खिडकाळी दरम्यान अरूंद भाग, सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. एक मार्गिकेतून धावणार्या अवजड वाहनांच्या मागे वाहनांचा रांगा लागत आहेत. एकाच वेळी कर्जत, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील वाहनांची या महामार्गावर रेलचेल असते. शिवाय बाहेरून येणारी मालवाहू वाहने धावत आहेत. त्यामुळे दररोज कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.
घोडबंदर रस्त्याचा भार भिवंडी - चिंचोटी रस्त्यावर
भिवंडी : घोडबंदर रस्ता दुरुस्तीसाठी शुक्रवारपासून सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे घोडबंदर रस्त्यावरील जड - अवजड वाहने चिंचोटी - विरार , शिरसाड फाटा - पारोळ मार्गे वळवण्यात आली आहेत. त्यामुळे चिंचोटी ते अंजूर फाटा आणि शिरसाड फाटा ते पारोळ मार्गे भिवंडी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे लाडक्या बहिणीसह वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे वाहतूक कोंडी झाली असताना भजनलाल डेरी फॉर्म ते सागपाडा हद्दीत एक अवजड ट्रक पलटी झाला होता. त्यामुळेही कोंडीत भर पडली होती. दुपारनंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती.
पलावा पुलावर श्वास कोंडला
या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी पलावा येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मात्र हा पूल खुला केल्यापासूनच वादात सापडला आहे. पुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यावर काही परिणाम झालेला नाही. उलट पुढच्या चौकात वाहतूक कोंडी वाढली आहे. शनिवारी या पुलावरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालक पुलावर अडकून पडले होते.
वर्षानुवर्षे तोच रस्ता...तेच ट्रॅफिक...
वर्षानुवर्षे तोच रस्ता...तेच ट्रॅफिक...तिच घुसमट आणि तिच मागणी...आता आम्हालाही त्याच त्याच मुद्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे, असे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून टिका केली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांचे अर्ध आयुष्य या ट्रॅफिकच्या गर्दीतच सुरु होणार आणि या गर्दीतच संपणार असेही त्यांनी यात म्हंटले आहे.

