

डोंबिवली : पावसाने सर्वत्र धुमशान घातले असतानाच पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच कल्याणमध्ये भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत भिंतीखली चिरडून एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर २ मुले जखमी झाली असून त्यांच्यावर तातडीने नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. शाळेची मोडकळीस आलेली भिंत दुरूस्त करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी शाळेकडे पाठपुरावा केला होता. अखेर याच भिंतीखाली चिरडून मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकीकडे हळहळ, तर दुसरीकडे संताप व्यक्त केला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कल्याणमधील श्रीकृपा चाळ परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सुट्टी असल्यामुळे मुले खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. श्रीकृपा चाळीत राहणारी मुले देखील शाळेला सुट्टी असल्यामुळे परिसरातील मोकळ्या जागेत वेगवेगळे खेळ खेळत असतात. तेथेच असलेल्या के. बी. के इंटरनॅशनल शाळेच्या भिंतीलगत परिसरातील काही मुले खेळत होती. अचानक शाळेची भिंत खेळणाऱ्या मुलांवर कोसळली. भिंतीच्या ढिगाराखाली ३ मुले अडकली होती.
हे पाहून स्थानिक रहिवाशांनी तात्काळ धाव घेऊन भिंतीचा ढिगार बाजूला केला. जखमी मुलांना तात्काळ नजिकच्या खासगी रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या ११ वर्षीय मुलाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अंश राजकुमार सिंह असे मृत मुलाचं नाव आहे. जखमी झालेल्या अन्य दोन मुलांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अंशच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रूग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला होता.
स्थानिक रहिवाशांनी शाळा प्रशासनाकडे धोकादायक भिंत दुरूस्त करून घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. तथापी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडली. शाळेची मोडकळीस आलेली भिंत कोसळल्याने या भिंतीखाली चिरडून दोन मुले गंभीर जखमी झाली. तर एकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
दुर्घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भिंतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. स्थानिक पोलिसांनी देखिल घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या सबंधितांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलिसांनी या दुर्घटने संदर्भात चौकशी सुरू केली आहे.