

सापाड : योगेश गोडे
कल्याण रिंगरोड मार्गावरील रोनक सिटी परिसरात महावितरणच्या कारभारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी केबल टाकण्यासाठी महावितरणकडून दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदण्यात आला. मात्र तब्बल दोन महिने उलटून गेल्यानंतरही केबल टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी खोदलेले रस्ते वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महावितरणाच्या भुयारी केबल लाईन टाकण्याच्या कामासाठी रोनक सिटी परिसरातील रिंगरोड खोदकामामुळे परिसरातील मुख्य मार्ग कायम वाहतूककोंडीने ग्रासलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना डांबरी रस्ता ऐवजी चिखल, खड्डे व अव्यवस्थित मातीच्या ढिगार्यातून वाहनं चालवावी लागत आहेत. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मॉर्निंगवॉकसाठी सकाळी संध्याकाळ घराबाहेर पडणारे नागरिक तसेच नोकरीसाठी रोज प्रवास करणार्या नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत असून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे स्थानिकांमध्ये नाराजीला उधाण आले आहे. महावितरणकडून केवळ खोदकाम करण्यात येते, पण काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली जात नाही. खोदलेल्या रस्त्यांकडे प्रशासन व महावितरण दोघेही दुर्लक्ष करत आहेत.
अशा निष्काळजी कारभारामुळे रोनक सिटी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, रस्त्यावर खोदकाम सुरू असताना सुरक्षा बाबींनाही दुजोरा दिलेला नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. रात्रीच्या वेळी अंधारात हे खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना व सुरक्षा चिन्हे नसल्याने हा अपघाताचा धोका अधिक वाढतो. महावितरणने केवळ रस्ता उकरून ठेवला आहे, काम पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. नागरिकांचे हाल पाहणारे तरी कोणी नाही.
रोहन म्हात्रे, स्थानिक ग्रामस्थ
गेल्या महिनाभरापासून हा रस्ता खोदून ठेवला आहे. शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी रोज प्रवास करणारे नागरिक आणि व्यापारी वर्ग या सर्वांना या खोदकामाचा फटका बसत आहे. महावितरणच्या भोंगळ कामामुळे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शारदा शिंदे, व्यापारी
रिंगरोड हा कल्याणमधील महत्त्वाचा मार्ग आहे, तोच जर निष्काळजीपणे उकरून ठेवला तर जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. महावितरणवर तातडीने कारवाई करून रस्ता सुरळीत करावा.
प्रवीण पाटील, चालक