

डोंबिवली : कल्याण-मुरबाड रोडला सिंडिकेट परिसरातील दारूबंदी अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत.
मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील सुरक्षा आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.