Kalyan News | मुलांसाठी खाऊ आणायला गेलेल्या माऊलीचा विजेचा शॉक लागून अंत! महावितरणच्या बेजबाबदारपणावर नागरिक संतप्त

पोलिसांवरही खर्चा-पाणी मागितल्याचा गंभीर आरोप, रस्त्‍यावर उघड्या पडलेल्या तारेचा झाला स्पर्श
Kalyan News
मुलांसाठी खाऊ आणायला गेलेल्या माऊलीचा विजेचा शॉक लागून अंत!
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात बुधवारी मुसळधार पावसात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका माऊलीचा हकनाक बळी गेला. मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शशी राहूल चक्र या ३२ वर्षीय महिलेचा रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या वीज वाहिनीशी संपर्क आल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाच्या पाण्यात उतरला करंट अन् काळाचा घाला

शशी चक्र या पती राहूल आणि दोन लहान मुलांसह हनुमान नगर परिसरात राहत होत्या. बुधवारी पावसादरम्यान त्या मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्याचवेळी रस्त्यावर महावितरणची वीज वाहिनी तुटून पडलेली होती. पावसाच्या साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. स्थानिक रहिवाशांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

दुःखात असताना पोलिसाने मागितला खर्चा-पाणी

या घटनेचा तपास टिळकनगर पोलिस करत आहेत. मृत महिलेचे पती राहूल चक्र यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर रूग्णालयातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टिळकनगर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने ‘खर्चा-पाणी’ देण्याची मागणी केल्याचा आरोप राहूल चक्र यांनी केला. पत्नी गमावल्याच्या दुःखात असताना पोलिसांकडूनच अशी मागणी झाल्याने राहूल यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप

पावसाळ्यापूर्वी धोकादायक विद्युत तारा आणि खांबांची तपासणी करण्याची जबाबदारी महावितरणची असते. मात्र रस्त्यावर वीज वाहिनी उघड्यावर पडून राहिल्याने एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे रहिवाश्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पिडीत कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. पोलिसांनी महावितरणच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी आणि खर्चा-पाणी मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावरील आरोपाचीही सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news