

ठळक मुद्दे
लिफ्टमध्ये आठ जण होते, त्यापैकी चार जण गंभीर जखमी, दोघांचे पाय फॅक्चर
नादुरुस्त लिफ्ट सुरू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप
महापालिका अधिकारी आणि लिफ्ट मेटेनन्स कंपनीवर रहिवाशांचा संताप
सापाड (कल्याण, ठाणे) : कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील रॉयस इमारतीत धक्कादायक अपघात घडला. इमारतीतील लिफ्ट सहाव्या मजल्यावरून अचानक खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात लिफ्टमध्ये अडकलेल्या आठ जणांपैकी चौघांना गंभीर दुखापत झाली असून दोघांचे पाय फॅक्चर झाले आहेत. त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून काहींना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉयस इमारतीतील राहणाऱ्या अंकित मेस्त्री यांच्या घरी मित्रमंडळी गणेश दर्शनासाठी गेले असताना हा प्रकार घडला. अचानक लिफ्ट कोसळल्याने क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
महापालिका अधिकारी लिफ्टरतर सुरक्षाविषयक तपासणीकडे गंभीरपणे लक्ष देत नाहीत. रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही गंभीर बेफिकिरी असून प्रशासन जबाबदार आहे.
- हेमंत कुंभार, पीडित
स्थानिक रहिवाशांनी तत्काळ जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ही लिफ्ट मेंटेनन्समध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीदेखील नादुरुस्त लिफ्ट चालू ठेवण्यात आली होती, असा गंभीर आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या अपघातामुळे रॉयस इमारतीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.