

डोंबिवली : कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका ३३ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडून पाच महिने उलटल्यानंतर मृत तरुणाची 'सुसाईड नोट' हाती लागली आणि या घटनेमागचे धक्कादायक सत्य उघडकीस आले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित 'बॉस' विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज बडगुजर (वय ३३) असे जीवन संपविलेल्या तरुणाचे नाव असून, तो कल्याण जवळील शहाड (पूर्व) येथील सेंचुरी परिसरात राहत होता. पंकज ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत कार्यरत होता. १९ सप्टेंबर २०२५ रोजी तो या कंपनीत रुजू झाला होता. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू असताना, काही दिवसांतच कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या त्रासाला कंटाळून पंकजने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वडिलांना नोकरी सोडत असल्याचे सांगितले; मात्र त्यामागील नेमके कारण त्याने कुटुंबाला सांगितले नाही.
१३ डिसेंबर २०२५ रोजी पंकज कंपनीचे ओळखपत्र (आयडी कार्ड) जमा करण्यासाठी गेला होता. तिथून परत आल्यानंतर तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्याच रात्री 'जेवण करून बाहेरून चक्कर मारून येतो' असे सांगून तो घरातून पडला, तो परतलाच नाही. कुटुंबाने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांना शहाड रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला. तपासाअंती तो मृतदेह पंकजचाच असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
आपला मुलगा जीवन संपवू शकत नाही, अशी खात्री पंकजच्या वडिलांना होती. अखेर पाच महिन्यांनंतर कुटुंबीयांच्या हाती पंकजने लिहिलेली सुसाईड नोट लागली. या पत्रात पंकजने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कशाप्रकारे छळ केला जात होता आणि कोणत्या मानसिक त्रासातून तो जात होता, याचे विदारक वर्णन केले होते. हे पत्र वाचताच वडिलांना प्रचंड धक्का बसला आणि त्यांनी तातडीने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले.
पंकजच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि सुसाईड नोटच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.