

डोंबिवली : बायकोचा गळा घोटून तिला ठार मारून आलोय...अशा पद्धतीने कबुली देणाऱ्या खुन्याचे शब्द ऐकून पोलिसही थक्क झाले. नाशिक पोलिसांनी जेव्हा कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना याची कल्पना दिली तेव्हा खडकपाडा पोलिसांनी उंबर्ड्यातील घरी जाऊन खात्री केली असता खुन्याची पत्नी मृतावस्थेत पडलेली आढळून आली. आता कल्याणचे पोलिस पथक खुन्याला अटक करण्यासाठी नाशिककडे रवाना झाले आहेत. विशाल भुतकर असे खुन्याचे नाव असून चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नी अर्चना हिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.
नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एक व्यक्ती आपल्या भावाला घेऊन गेला. त्या व्यक्तीने सांगितले की, माझा भाऊ काय बोलतो हे जरा ऐका. तेथील पोलिसांनी विशाल भुतकर नावाच्या या व्यक्तीची विचारपूस केली. विशालने सांगितले की, माझा पत्नीशी वाद होता. कल्याण जवळच्या उंबर्डे परिसरात माझी पत्नी अर्चना राहत होती. तेथे तिच्या घरी गेलो आणि गळा आवळून तिची हत्या केल्याची कबुली विशालने दिली.
खुन्याने स्वतःहून अशा पद्धतीने दिलेली कबुली ऐकून नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस हैराण झाले. मात्र विशाल खरे बोलतो आहे की भंकस करतो आहे ? याची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने सांगितलेल्या उंबर्ड्यातील पत्त्यावर पोहोचले. तेथील एका घरात एक महिला मृतावस्थेत पडलेली आढळून आली. विशालने जी माहिती दिली ती तंतोतंत खरी होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला.
संशयाचे भूत मानगुटीवर...
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद होता. विशाल आणि अर्चना यांना दोन मुले आहेत. एक मुल विशालकडे तर दुसरे मुल अर्चनाच्या आईकडे उंबर्ड्यात आहे. विशाल अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. संशयाचे भूत विशालच्या मानगुटीवर बसले होते. संतापाच्या भरात त्याने अर्चनाची गळा आवळून हत्या केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे.