

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील ऐतिहासिक काळा तलावात मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संचिता पडवळ असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे तरुणीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली की तिला कोणी ढकलून दिले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासादरम्यान तलाव परिसरातील पालिकेची लाखो रुपये खर्चाची सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याचे उघडकीस आल्याने पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिता पडवळ ही सोमवारपासून (दि. २७) घरातून बेपत्ता होती. तिचे कुटुंबिय तिचा शोध घेत होते, मात्र ती न सापडल्याने तिच्या पालकांनी सोमवारीच कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात ती हरवल्याची (बेपत्ता) तक्रार नोंदवली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच, मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास काळा तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवली असता तो संचिता पडवळ हिचा असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पडवळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतदेह ताब्यात घेऊन पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी संचिताने तलावात उडी मारून जीवन संपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तिला कोणीतरी ढकलून दिले असावे अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या काळा तलावाचे तब्बल १९ कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण आणि विकास करण्यात आला आहे. तलावाच्या सुरक्षेसाठी परिसरात तब्बल ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. संचिताचा मृतदेह आढळल्यानंतर घटनेचा सुगावा लावण्यासाठी पोलिसांनी तलावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळचे दृश्य पाहून पोलीसही चक्रावले; कारण पालिकेची सर्व ३२ सीसीटीव्ही यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आढळली.
लाखो रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही बंद असल्याचे उघडकीस येताच मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका मुख्यालयात धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला. घटनेचे गांभीर्य ओळखून महापौर, विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी तातडीने काळा तलाव परिसराला भेट देऊन पाहणी केली. केवळ कागदावर आणि निधी खर्चासाठी सुरक्षा यंत्रणा उभारल्या जातात, मात्र त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जात नाही, हा महापालिकेचा अनागोंदी कारभार या घटनेमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.