

डोंबिवली: कल्याण महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर, उल्हासनगर, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर या पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची वैधानिक सभा सोमवारी प्रथमच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कल्याण-डोंबिवलीसह उपनगरातील रहिवाशांकडून केली जाणारी वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. कल्याण महानगर परिवहन उपक्रमातील पहिल्या संचालक मंडळ बैठकीत शहर बससेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यात वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसह आधुनिक सेवा देणाऱ्या पहिल्या टप्प्यातील १०० बसेस रस्त्यावर धावणार आहेत.
कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादितची स्थापना झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित मार्फत ५ शहरांसाठी एकात्मिक, आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बससेवा उभारणे हे उद्दिष्ट आहे. यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळमधील अनुभवी अधिकाऱ्यांचा प्रकल्प गट तयार केला जाणार आहे.
ऑगस्टपर्यंत पहिला ताफा
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई-बस योजनेअंतर्गत चालकांसह मिळणाऱ्या ३० बसपैकी पहिल्या टप्प्यात १० बस ऑगस्ट महिन्यापर्यंत दाखल होतील. बाह्यस्रोत पद्धतीने वाहन आणि चालक उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेची निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारली जाणार आहे. यामुळे बसचा नेमका वेळ, मार्ग आणि स्थान मोबाईलवरून पाहता येणार आहे. तिकीट विक्रीबरोबरच बसच्या आत-बाहेर, बस थांबे आणि आगारात जाहिरातींद्वारे उत्पन्न वाढवण्याचा निर्णयही झाला आहे.
१० ठिकाणी नवीन आगार
बस संचालनासाठी कल्याण-डोंबिवलीतील गणेश घाट, कै. बाळासाहेब ठाकरे वसंत व्हॅली, बारावे, वाडेघर येथे आगार उभे राहणार आहेत. भिवंडी-निजामपूरमध्ये टेमघर साईबाबा, कोंबडपाडा, नागाव आणि उल्हासनगरमध्ये रियान्सी अँटेलिया, अजमेरा पॅराडाईज समूह, उल्हासनगर रेल्वे स्थानक येथे आगार निर्मितीचे काम सुरू होणार आहे. भविष्यात अंबरनाथ-बदलापूर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बस स्थानक उभारले जाणार आहे.
५ शहरांच्या महापौरांसह आयुक्त एकत्र
बैठकीला कल्याण-डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षला चौधरी, भिवंडीचे महापौर नारायण चौधरी, उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम, अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, कुळगाव-बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांच्यासह सर्व शहरांचे आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते. महामंडळाचे सचिव म्हणून परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळाचा आराखडा सादर केला.