

डोंबिवली : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी नोकरदाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात अभिजित देशमुख हा मराठी तरूण जबर जखमी झाल्याने मराठी-भैय्या वाद पेटला आहे. योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना घडली आहे. मी मंत्रालयात काम करतो. सर्व पोलिस मला घाबरतात. तुझ्यासारखे 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात. अश्या धमक्या देत अखिलेश शुक्ला याने सोसायटीतील रहिवाशांमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Kalyan Crime News)
अखिलेश शुक्ला याने गुंडांकरावी मारहाण केल्याचा आरोप जखमी अभिजित देशमुख यांनी केला आहे. या हल्ल्यात अभिजित देशमुख जखमी झाले असून त्यांना मुंबईत हलविण्यात आले.योगीधाम सोसायटीमध्ये सरकारी नोकर अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप-अगरबत्ती लावतात. धूप लावल्यामुळे वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात धूर जातो. त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षांच्या बाळासह वयोवृद्ध आईला दम लागतो. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या वर्षा यांनी गीता यांची समजूत काढली. धूप लावू नका असे सांगितले. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. शेजारी राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शुक्ला भडकले. त्यांनी काही लोकांना बोलवून अभिजित आणि धीरज देशमुख या दोघांना मारहाण केली. या हल्ल्यात घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर जखमी अभिजित देशमुख यांच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अखिलेश शुक्ला हे सरकारी नोकरी करतात. मात्र ते काय काम करतात याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
या संदर्भात विजय कळवीकट्टे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, अखिलेशसह त्यांच्या सात-आठ साथीदारांसह अभिजित देशमुख यांच्यावर रॉडने हल्ला चढविला. आपण मधे पडलो असता मलाही मारहाण करून बाजूला लोटले. मराठी माणसं भिकारी आहेत...त्यांना मारा...असेही हल्लेखोर शिवीगाळ करत एकमेकांना चिथावणी देत होते, असेही विजय कळवीकट्टे यांनी सांगितले.
देशमुख कुटुंबामागे मनसे ठाम उभी आहे. येत्या 24 तासांत सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.