

डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडवरील नेवाळी नाका ते चक्की नाका या मुख्य मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांना एक वर्ष पूर्ण झाल्याचे सांगत राजसैनिकांनी रस्त्यातच खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून केक कापला आणि निद्रिस्त प्रशासनाचा उपहासात्मक निषेध नोंदवला.
प्रभाग क्रमांक १६ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष निर्मल निगडे, विधानसभा क्षेत्र सचिव प्रशांत खैरनार, उपशहराध्यक्ष स्वप्निल पंडित, विभागाध्यक्ष देवेंद्र पिंगळे, विभाग संघटक सुनील जोशी, उपविभागाध्यक्ष सूरज जोशी, विभाग सचिव महेंद्र कुंदे, शाखाध्यक्ष युवराज कांबळे, उपशाखाध्यक्ष मुकुंद केदार, उपशाखाध्यक्ष अमोल इरेकर, विश्वास गायकवाड, नामदेव कांबळे, महाराष्ट्र सैनिक दीपक करांडे, गणेश करांडे यांच्यासह राजसैनिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवाळी नाका ते चक्की नाका हा कल्याण पूर्वेतील अतिशय महत्त्वाचा आणि रहदारीचा मार्ग आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. या मार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, चाकरमानी आणि स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
"खड्डे एक वर्षाचे झाले पण रस्ते अजूनही जैसे थे" आणि "कर आमचा, रस्ता कुठे?" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर मनसेचे कल्याण पूर्व विधानसभा सचिव प्रशांत खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केडीएमसीच्या 'आय' प्रभाग क्षेत्राच्या साहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. नेवाळी नाका ते चक्की नाका मार्गावरील सर्व खड्डे तातडीने कायमस्वरूपी आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विधानसभा क्षेत्र सचिव प्रशांत खैरनार म्हणाले, "नागरिकांकडून वेळेवर करवसुली करणाऱ्या प्रशासनाला रस्ते सुस्थितीत ठेवणे जमत नाही. खड्डेमुक्त रस्ते हा आमचा हक्क आहे, प्रशासनाचे उपकार नाहीत. महापालिकेला या निवेदनाद्वारे दहा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात येत आहे. या कालावधीत रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी केडीएमसी प्रशासनच जबाबदार राहील," असा इशाराही त्यांनी दिला.
आता केडीएमसी प्रशासन या अल्टीमेटमला कसा प्रतिसाद देते? याकडे कल्याण-मलंगगड मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह पादचारी आणि वाहनचालकांच्या नजरा लागल्या आहेत.