

Kalyan Hospital Receptionist Assault Case New Video
बजरंग वाळुंज, डोंबिवली
कल्याणच्या रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्टला मारहाणीच्या प्रकरणात बुधवारी ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर नवा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात रिसेप्शनिस्टनेच आधी गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. याच घटनेमुळे गोकुळ झा हा संतापला असावा, असा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनीही या व्हिडिओच्या आधारे चौकशीला सुरूवात केली आहे.
नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
सोशल मीडियामध्ये बुधवारी दुपारपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणीचा आवाज येत आहे. तरुणी एका महिलेला शिवीगाळ करत असून 'समजत नाही का', असा प्रश्नही विचारताना ऐकू येते. याच व्हिडिओच्या शेवटी असे दिसते की, संबंधित तरुणीने गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावली आणि यानंतर संतापलेल्या गोकुळने त्या तरुणीला मारहाण केली.
व्हायरल व्हिडिओवर तरुणीचे म्हणणे काय?
पीडित तरूणीनेही प्रसारमाध्यमांसमोर स्वतःची बाजू मांडली. ‘आपल्याला मारहाण होत असताना कुटुंबातील कुणीही त्याला थांबवले नाही. त्याला कुणीच रोखले नसल्याने रागाच्या भरात त्याच्या वहिनीच्या कानाखाली लगावली’, असे पीडित तरुणीने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
प्रकरण काय आहे?
कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात असलेल्या श्री बाल चिकित्सालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरूणीला गोकुळ झा याने बेदम मारहाण केली होती. यात तरुणीचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाची मारहाण, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर राजकीय पक्षही आक्रमक झाले. मनसैनिकांनी गोकुळ झाला शोधून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, आता या प्रकरणातील नवा व्हिडिओ समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नेमका हा प्रकार काय आहे ? रिसेप्शनिस्ट तरूणीने आधी मारहाण केली की नंतर ? हल्ल्याची घटना घडल्यानंतर तरूणीने गोकुळच्या वहिनीला मारहाण आधी केली की नंतर ? याचा उलगडा करण्यासाठी एकीकडे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.
गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी
गोकुळ झावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल झाले होते. बुधवारी दुपारी पोलिसांनी गोकुळ झाला तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण कोर्टासमोर हजर केले. सुनावणी वेळी गोकुळ झाने माझ्यावर चुकीची कारवाई म्हणत, माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. कोर्टाने गोकुळ झाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.