Kalyan heavy rain | कल्याणसह विठ्ठलवाडीच्या एसटी सेवेला अतिवृष्टीचा फटका

कल्याण आगाराच्या ४२ फेऱ्या रद्द : प्रवाशांना १०० टक्के परतावा मिळणार
Kalyan heavy rain | कल्याणसह विठ्ठलवाडीच्या एसटी सेवेला अतिवृष्टीचा फटका
Published on
Updated on

डोंबिवली : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण आणि विठ्ठलवाडी आगारातील एसटी बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टी आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे बसेस रद्द झाल्याच्या कारणामुळे प्रवाशांना त्यांच्या आगाऊ तिकिटांचा १०० टक्के परतावा देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कल्याण आगाराच्या ४२ फेऱ्या रद्द झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी दिली.

    विठ्ठलवाडी आगारातून सुटलेल्या काही एसटी बसेस पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. या गाड्या वेळेत परत न आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मात्र चालक आणि वाहक यांच्याशी आगार प्रशासनाचा संपर्क असून ते सुरक्षित असल्याची दिलासादायक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विशेषतः विठ्ठलवाडी आगारातून ईश्वरपूर, विटा आणि कोकणच्या दिशेने जाणाऱ्या एसटी सेवांवर पावसामुळे विपरीत परिणाम झाला असल्याने त्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ज्या प्रवाशांच्या एसटी बसेस पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत, अशा प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे (१०० टक्के परतावा) परत दिले जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी प्रवाशांनी संबंधित आगारात येऊन रीतसर अर्ज करावा किंवा प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विठ्ठलवाडी आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अविनाश गोसावी यांनी केले आहे. ​

माळशेज मार्गे वाहतूक सुरळीत
पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन आणि वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या सूचनांनुसारच पुढील बस फेऱ्यांचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकीकडे अनेक फेऱ्या रद्द झाल्या असल्या तरी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे कल्याण अहिल्यानगर महामार्गावर, अर्थात.माळशेज घाटातून होणारी एसटी वाहतूक अद्याप सुरळीत असल्याचे वृत्त आहे. या मार्गावरील बसेस नियमितपणे धावत असून त्यावर पावसाचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news