

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी हे दोघे सद्या तुरूंगात आहेत. विशाल गवळी याचा मोबाईल पोलिसांनी शोधून काढला असून या मोबाईलमध्ये बरेच काही दडले आहे. या मोबाईलमध्ये नेमकं काय धडलंय, या पाहण्यासाठी पोलिसांनी हा मोबाईल फॉरेन्सीक लॅबकडे तपासणीकरिता पाठविला आहे. या मोबाईलमधून तांत्रिक माहितीच्या आधारे घडलेल्या घटनेविषयी काही पुरावे मिळतात का ? या अंगाने तपास सुरु आहे. फॉरेन्सीक लॅबकडून येणाऱ्या अहवालाकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत.
२३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बालिकेची हत्या केल्यानंतर कल्याणमधून विशाल गवळी हा बुलढाण्यातील शेगावकडे पसार झाला होता. जाण्यापू्र्वी त्याने दारु खरेदी केली होती. त्यानंतर तो बुलढाण्याला निघाला. त्याने पोलिस चौकशीत त्याचा मोबईल कसारा घाटात फेकल्याचे सांगितले होते. सीम कार्ड काढून त्याने मोबाईल कसारा घाटात फेकल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी केलेल्या अधिकच्या तपासात त्याने त्याचा मोबाईल बुलढाण्यातील एका लॉज चालकास पाच हजार रुपयांना विकला होता. लॉज चालक दीपक तायडे यांच्याकडून पोलिसांनी तो मोबाईल हस्तगत केला आहे. घटनेनंतर गवळी याने त्याच्या सोशल मिडियावरील सर्व आकाऊंट डिलीट केले होते. त्यामुळे त्याचा मिळून आलेल्या मोबाईलमधून त्याने डाटा डिलीट केला होता का ? या अंगाने पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिस सदर मोबाईलद्वारे तळाशी जाऊन माग काढणार आहेत. सदर मोबाईलचा डाटा रिकव्हर करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल मुंबईतील कालिना इथल्या फॉरेन्सीक लॅबकडे पोलिसांनी पाठविला आहे.
बालिकेवर अत्याचार केल्यानंतर खून करून तिचा मृतदेह एका बॅगेत भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. ही बॅग अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. विशाल याने गुन्ह्यात वापरलेली बॅग ही कल्याणच्या खाडीत फेकून दिली असून पोलिसांनी खाडीत १२ किलोमीटर अंतरापर्यंत बॅगचा शोध घेतला, पण ती बॅग पोलिसांना अद्याप सापडली नाही. बालिकेची हत्या आरोपीने गळा दाबून केली असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. मात्र जे. जे. रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या कमिटीकडून मृतदेहाचा उत्तरित तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त होण्यास थोडा वेळ लागणार आहे.
बालिका हत्याकांड २३ डिसेंबर २०२४ रोजी घडले होते. आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना २५ डिसेंबरला अटक करण्यात आली. आरोपीच्या अटकेनंतर आता १५ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा दोषारोप पत्र दाखल केले जाणार आहे. तर या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली आहे. दोषारोप पत्र दाखल झाल्यावर हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. दोषारोपत्र दाखल होताच खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे.
आरोपी विशाल गवळीच्या विरोधात विविध स्वरुपाचे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला या आठही गुन्ह्यात न्यायालयातून जामीन मिळाला आहे. या गंभीर गुन्हयात त्याला जमीन कसा काय मिळाला ? असा प्रश्न उपस्थित होत असताना त्याने मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचा मुद्दा समोर आला होता. पोलिसांच्या मते त्या दिशेने तपास केला असता त्याच्याकडे अद्याप तरी तो मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आढळून आले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.