

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी परिसरातील तुलसी पार्क बिल्डिंगसमोर मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीचे पर्यवसान गोळीबारात झाले. प्रेम अजय सिंग उर्फ गुंडा आणि सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी या दोन गटांमधील जुन्या वादातून झालेल्या या गोळीबारात भांडण सोडवण्यासाठी गेलेला राहूल अशोक वर्मा हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कंबरेखाली गोळी लागली असून त्याच्यावर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्कॉर्पिओ/स्कूटीच्या कटवरून रक्तरंजित राडा
या संदर्भात कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११ वाजता प्रेम गुंडा याच्या स्कॉर्पिओला सुदर्शन निकाळे याच्या स्कूटीने कट मारल्याच्या कारणावरून दोन्ही गट विठ्ठलवाडी येथील तुलसी पार्क बिल्डिंगसमोर आमनेसामने आले. यावेळी झालेल्या हाणामारीत प्रेम गुंडा टोळीतील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू रमेश राठोड याने त्याच्याकडील गावठी पिस्तूलातून गोळीबार केला. या गोळीबारात भांडण सोडवण्यासाठी गेलेला राहूल अशोक वर्मा (रा. चक्की नाका, कल्याण-पूर्व) याला गोळी लागून तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
परस्परविरोधी गुन्हे नोंदवून ६ हल्लेखोर तात्काळ चतुर्भुज
या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सुदर्शन संजीव निकाळे याच्या तक्रारीवरून प्रेम अजय सिंग उर्फ गुंडा आणि ओंकार धोंडीराम जगदाळे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. एकावर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनीएक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.
सनी किरण कटारे याच्या तक्रारीवरून सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी, संजय शर्मा, कार्तिक पवार आणि पवन चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५ (२), १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९० सह आर्म्स ॲक्टचे कलम ३, २५, २७ व महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण, अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
डीसीपी अतुल झेंडे ॲक्शन मोडवर
घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. पोलिसांनी जलद कारवाई करत चार हल्लेखोरांना तत्काळ ताब्यात घेतले. गुन्हेगारांवर वचक बसावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी डीसीपी अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत हल्लेखोरांची भररस्त्यात धिंड काढण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांना दोरीने बांधून, वाकवून उठा/बशा काढायला लावल्या.
स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण
आत्मानगर परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची दहशत वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. वारंवार घडणाऱ्या मारहाण आणि आता थेट गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुंडांवर कायमस्वरूपी कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून गोळीबारामागील नेमके कारण, शस्त्र आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे.