

डोंबिवली : गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण-मोहने रोडला असलेल्या बंदर पाड्यातून फळ विक्रेत्याचा मुखवटा धारण करणार्या सराईत गुंडाला अटक केली आहे. सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (30) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव असून या बदमाशाकडून एक जिवंत काडतूसासह 2 देशी बनावटीची पिस्तूले हस्तगत करण्यात आली आहेत.
कल्याण-मोहने रोडला असलेल्या बंदर पाड्यात राहणार्या एका सराईत गुन्हेगारीकडे अग्निशस्त्रे असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे यांना खासगी गुप्तहेराकडून मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनिल तारमळे, सपोनि श्रीकृष्ण गोरे, सपोनि भूषण कापडणीस, पोउपनि सुहास तावडे, सपोउपनि संदीप भोसले आदींच्या पथकाने बुधवारी पावणे पाचच्या सुमारास बंदर पाड्यातील रोशन किराणा दुकानाजवळ सापळा लावला होता.
व्यवसायाने फळांची विक्री करणार्या सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 1 लाख 500 रूपये किंमतीची जिवंत काडतूसासह दोन देशी बनावटीची पिस्तूले सापडली. कोणतेतरी दखलपात्र गुन्हे करण्याच्या इराद्याने या अग्नीशस्त्रांचा वापर करण्यापूर्वीच खंडणी विरोधी पथकाने सचिन गोपी उर्फ गोकुळ याच्या मुसक्या आवळल्या. या बदमाशाच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अग्निशस्त्रांच्या साठ्यासह अटक करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सचिन गोपी उर्फ गोकुळ याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात यापूर्वी सशस्त्र हाणामारीसह अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दोन गुन्हे दाखल असल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. या गुंडाने त्याच्याकडे सापडलेली अग्निशस्त्रे कुठून व कुणाकडून आणली ? या अग्निशस्त्रांची तो विक्री करणार होता की त्यांचा वापर कुणाचा तरी खात्मा करणार होता का ? याचा चौकस तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत.