

Water Cut In Kalyan Dombivli
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १८ तास संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल/दुरूस्ती करावयाची आहे.
सदर देखभाल/दुरूस्तीची कामे करण्याकरिता मंगळवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत १८ तास महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे, तसेच डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरास होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून व पुरेसा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारच्या पाणी बंदची नोंद घेऊन आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.