

Kalyan Dombivli Water Crisis
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे १०० रहिवाशांनी बुधवारी (दि.२१) दुपारी बारा वाजता स्वयंस्फूर्तीने एकत्र येत डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत धडक दिली.
या मोर्चादरम्यान रहिवाशांनी पाणी खात्याचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपला तीव्र संताप आणि आक्रोश व्यक्त केला. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांना या मोर्चाबाबत आधीच कल्पना देऊनही ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गेल्याने रहिवाशांचा संताप आणखी वाढला. यावेळी रहिवाशांनी एमआयडीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या सलग ३६ तासांच्या पाणी पुरवठा बंदच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. पाण्याच्या मुख्य जलवाहिन्यांमधून होणाऱ्या गळती आणि ठिकठिकाणी होणाऱ्या पाणी चोऱ्या तातडीने थांबवाव्यात आणि अशा प्रकारांवर कडक कारवाई करावी, अशा मागण्या रहिवाशांनी जोरकसपणे मांडल्या.
ज्येष्ठ नागरिक संस्थेचे बबन काळे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत येत्या शुक्रवार आणि शनिवारचा ३६ तासांचा शटडाऊन तात्काळ रद्द करावा, अन्यथा आम्ही मोठ्या संख्येने पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर धडक मारून येथेच ठिय्या देऊ असा थेट इशारा दिला. यावेळी अनेक महिलांनी संताप व्यक्त करत पाणी पुरवठ्याच्या नियोजनाबाबत एमआयडीसी प्रशासनाला धारेवर धरले. अश्विनी भंडारी यांनी अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला आणि जर पाणी पुरवठ्यात योग्य सुधारणा झाली नाही तर पुन्हा आम्ही कार्यालयावर धडक मारू असा निर्धार सर्व मोर्चेकऱ्यांनी एकमुखाने व्यक्त केला.
या आक्रोश मोर्चात रहिवाशांसोबत सर्व पक्षीय कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, बबन काळे, संजय चव्हाण, राजू नलावडे, अजय घोरपडे, अश्विनी भंडारी, आनंद पाटणे, दीपक भानुशाली, किशोर पेटकर, विलास बोरोले यांच्यासह सुमारे १०० महिला आणि पुरुष रहिवाशांनी उपस्थित राहून प्रत्येकाने अधिकाऱ्यांना जाब विचारत पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
मनसेचा एमआयडीसीला इशारा
पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. बारवी धरणातून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही डोंबिवलीला वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे, इतर सोसायट्यांपेक्षा जास्त दराने पाणी घेऊनही अनियमित पुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त असल्याचे म्हटले आहे. मुख्य जलवाहिनीवर असलेली अनधिकृत सर्व्हिस कनेक्शन तात्काळ बंद करावीत आणि पाणी कपातीच्या काळात रहिवाशांना बोरवेल मारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वसामान्य सोसायट्यांना एमआयडीसीच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नसून टँकरचा पर्याय अत्यंत खर्चिक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. महाराष्ट्रातील पाणी टंचाई समजून घेऊन आठवड्यातून दोन वेळा १२ तास पाणी बंद ठेवण्यास हरकत नसली तरी २२ ऑक्टोबर पासून सलग ३६ तास पाणी बंद करण्याच्या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला असून असा निर्णय घेतल्यास संपूर्ण विभागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला आहे.