

डोंबिवली : दिवाळी सण येता...नाही आनंदाला तोटा...दिवाळी सण साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असतानाच चोरट्यांनी मात्र हातसफाई जोरात सुरू केल्याच्या घटना सालाबाद प्रमाणे यंदाही वाढल्या आहेत. चोरटे प्रामुख्याने बसने प्रवास करणाऱ्या पुरूषांसह वृध्द महिलांना देखिल लक्ष करत असल्याने महिलांच्या मनात भितीचे काहूर माजले आहे. चोरट्यांनी मंदिरांना देखील लक्श केल्याचे डोंबिवलीतील एका घटनेतून अधोरेखित झाले आहे.
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे एस. टी. बस आगार, बाजुचा वल्लीपीर रस्ता भुरट्या चोरट्यांचे आश्रयस्थान झाले आहे. दररोज बस आगारातील ज्येष्ठ महिला प्रवाशांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या, प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी संध्याकाळी एका प्रवाशाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. आपला महागडा मोबाईल गायब होताच अस्वस्थ झालेल्या कल्याण पूर्वेतील चक्कीनाका चेतन हायस्कूल परिसरात राहणाऱ्या संतोष साळवे या रहिवाशाने कल्याणहून वाशीकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला धावपळ करत रोखून धरले.
घटनास्थळी पोलिसांना पाचारण केले. बसमध्ये कुणी प्रवासी चोरटा आहे का याची खातरजमा केली. चोरट्यांनी संतोष यांचा मोबाईल चोरल्यावर बसमधून उतरवून तात्काळ पलायन केले होते. त्यामुळे महागडा मोबाईल हाती लागला नाही. दिवाळी सण आणि मे महिन्यातील सुट्टीच्या कालावधीत रेल्वे स्थानक आणि एसटी आगारात प्रवाशांची गर्दी असते. या कालावधीत अनेक प्रवासी हातात मोबाईल, तर गळ्यात सोन्याचा ऐवज परिधान करून प्रवास करतात. अशा ऐवज घातलेल्या ६० वर्षावरील महिला आणि पुरूष प्रवाशांना लक्ष्य करून चोरटे बसमध्ये प्रवासी म्हणून चढतात. त्यानंतर प्रवाशाच्या हातातील तसेच गळ्यातील सोन्याचा ऐवज लांंबवून बसमधून उतरवून पसार होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. एसटीचे अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी उदासीन असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसतो.
कल्याणच्या चक्कीनाका परिसरात राहणारे संतोष साळवे यांची पत्नी शिळफाटा परिसरात राहणाऱ्या आपल्या माहेरी सोमवारी संध्याकाळी चालली होती. पत्नीला बसमध्ये बसविण्यासाठी संतोष कल्याणमध्ये वाशी बस स्थानकावर आले होते. कल्याण-वाशी बसमध्ये पत्नीच्या पिशव्या चढवून दिल्यानंंतर संतोष बसमधून खाली उतरले. पँटच्या खिशातील मोबाईल गायब झाल्याचे लक्षात येताच आपला मोबाईल बसमधील चोरट्याने चोरल्याचा संशय घेत संतोष यांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाच्या पिशवीची झडती घेण्यासाठी बस रोखून धरली. पोलिसांना बस थांब्यावर पाचारण केले. संतोष यांनी स्वत:सह पोलिस आणि बसच्या वाहकाने प्रवाशांच्या पिशव्या तपासल्या. तथापी कुणाकडेही मोबाईल आढळला नाही. तपासणीनंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. मात्र मोबाईल गहाळ झाला म्हणून बस रोखून धरल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत कल्याणच्या एसटी आगारातून सहाहून अधिक महिला प्रवाशांच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्या. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पनवेल जवळच्या पळस्पे येथील ब्राम्हण आळीत राहणाऱ्या रेखा जगदीश दामोदरे (६४) या कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर चौक येथे एसटी बसमध्ये पनवेलला जाण्यासाठी गर्दीतून चढत होत्या. या गर्दीत रेखा यांच्या उजव्या हातामधील सोन्याची बांगडी (पाटली) कटरच्या साह्याने तोडून चोरट्याने दीड लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. बसमध्ये चढल्यावर रेखा यांना त्यांच्या बांगड्या चोरीस गेल्याचे लक्षात आले. तशाच अवस्थेत त्यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तर ग्रामीण भागातील वसार (मांगरूळ) गावचे रहिवासी असलेल्या बाळाराम गोपाळ शेलार (५८) यांनाही चोरट्यांनी दणका दिला.
बाळाराम हे कल्याण-मलंगगड रोडने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने बाळाराम यांच्या गळ्यातील ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन खेचून पोबारा केला. याप्रकरणी बाळाराम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
पश्चिम डोंबिवलीतील कोपरगाव मध्ये शिवमंदिर आहे. सोमवारच्या पहाटे या मंदिरात घुसून चोरट्यांनी तेथील पितळी धातूचा मोठा घंटा पितळी धातूच्या दोन समया आणि पितळी धातूचा एक नाग असा वीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पलायन केले. हा सारा प्रकार सकाळी सातनंतर मंदिरात आलेल्या भाविकांच्या लक्षात आले. या प्रकरणी सोमनाथ कुंडलिक पाटील (५४) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विष्णूनगर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.