

Meat Shops Closed KDMC
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांची कत्तल तसेच मांस विक्रीवर २४ तासांसाठी बंदी घातली आहे. बाजार व परवाना विभागाने यासंदर्भात जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शनिवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
शासन परिपत्रकानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मोठ्या जनावरांची कत्तल, मांस विक्री करणाऱ्या खाटीक कसाई आणि अधिकृत परवानाधारकांना या कालावधीत आपले कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भात केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभक्तीची भावना जपत नागरिकांनी शांतता आणि सौहार्द राखावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नमूद कालावधीत कोणत्याही प्रकारची कत्तल अथवा मांस विक्री आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी सर्व परवानाधारक व्यापारी आणि संबंधित संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. केडीएमसीच्या बाजार व परवाना विभागाकडून शहरभर या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.