

Kalyan Dombivli Municipal Corporation polls
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूक उमेदवारांनी मतदारांना आमिष दाखविण्याचे सुरू केले आहे. मी तुमच्यासाठी खूप काही करतो, असे दाखविण्याच्या नादात काही धनाढ्य उमेदवारांनी आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर कल्याण-डोंबिवलीतील प्रभागांमध्ये विविध उपक्रमांचा सपाटा लावला आहे. आरोग्य, हळदी-कुंकू समारंभ, मोफत पर्यटन, ओल्या पार्ट्यांसह ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्र यंत्रांसारख्या मोहिमा राबविणाऱ्या स्वयंघोषित समाजसेवकांच्या प्रभागांगणिक चढाओढी लागलेल्या दिसून येतात.
आपल्या प्रभागांतील मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने खासगी बसेस भरून आपल्या प्रभागातील ज्येष्ठ मतदार नागरिकांना जेजुरी, शिर्डी, गणपतीपुळे, एकविरादेवी, आदी देवस्थानांच्या दर्शनासाठी पाठविले आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही उमेदवारांनी त्यांच्या किंवा भाड्याच्या फार्म हाऊसवर ओल्या पार्ट्या, डीजे पार्टी आणि पोपटी-मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन सुरू केले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील अनेक नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांचे शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा, महाबळेश्वर, आदी परिसरात फार्म हाऊस आहेत. त्या ठिकाणी खासगी गाड्या व बसेसद्वारे तरूणांना, तसेच ज्येष्ठांना पर्यटनासाठी नेले जात आहे. कोणताही आर्थिक खर्च न करता पर्यटन आणि मौज-मज्जा करता येत असल्याने या उपक्रमांना नागरिकांचा, विशेषतः तरूण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
फार्म हाऊसवर नेण्यात आलेल्या तरूण व नागरिकांसाठी चुलीवरील मटण-भाकरी, तिखट जेवणाची खास व्यवस्था केली जात आहे. गावठी कोंबड्या, नदीतली मासळी, त्यातच हव्या त्या ब्रँडची दारू, तर शाकाहारींकरिता श्रीखंड-पुरीचा बेत ठेवण्यात येतो, अशी माहिती पर्यटनाहून परतलेल्या मतदारांकडून दिली जात आहे.
इच्छुक उमेदवार प्रभागातील तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या, शिर्डी, तिरुपती येथे रेल्वेने दर्शनासाठी घेऊन जाण्याचे नियोजन करत आहेत. प्रवासासाठी गट तयार करून दोन ते तीन टप्प्यांत विविध देवस्थानांचे दर्शन घडविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. नवख्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांचे उंबरठे झिजवायला सुरूवात केली आहे.
निवडून येण्याची खात्री असो वा नसो, मात्र अशा हवश्या, नवश्या, गौश्यांनी आतापासूनच मतदारांना झुलवत ठेवण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविले जात आहेत. निवडणुकांच्या पूर्वीच अशा पद्धतीने प्रचाराची मोहीम उघडण्यात आली आहे. तर अशा उपक्रमांमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.