

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेच्या ९/आय प्रभाग क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिंचपाडा परिसरातील पवारनगरमध्ये सोमवारी महापालिकेने धडक कारवाई केली. कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या १४ बेकायदा बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी शहरातील रहिवासमुक्त असलेल्या बेकायदा इमारती प्राधान्याने पाडण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. स्वस्त घरांचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या भूमाफियांवर 'एमआरटीपी' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या आदेशानंतर अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कंबर कसली असून, सोमवारी सकाळी चिंचपाडा परिसरात कारवाईचा धडाका लावला.
पवारनगर भागातील अनधिकृतपणे उभारण्यात येत असलेल्या दोन चाळींवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १४ पत्राशेड असलेल्या विटांच्या बांधकामांचा आणि पूर्णत्वास आलेल्या १४ बैठ्या खोल्यांचा समावेश होता. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईसाठी पालिकेचे अधिकारी, ७ कर्मचारी, ८ पोलीस कर्मचारी, कंत्राटदाराचे १० मजूर आणि २ जेसीबींच्या साहाय्याने सर्व बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.
कारवाई सुरू असताना स्थानिक रहिवासी आणि संबंधित बांधकामधारकांनी प्रशासनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे विरोध करणाऱ्यांची 'डाळ शिजली नाही'. कोणत्याही अनुचित प्रकाराविना ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आल्याची माहिती अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी दिली.