KDMC revenue recovery drive
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाpudhari file photo

KDMC revenue recovery drive : करचुकव्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारवाईचा बडगा

जप्ती, अटकावणीसह नळजोडण्याही खंडित करण्याची कारवाई सुरू
Published on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर व प्रभावी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. सन 2025-2026 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर देयके नागरिकांना वितरित करण्यात आली असून वेळेत कर भरणाऱ्यांसाठी सवलत योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर जप्ती, अटकावणी, तसेच नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेने आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी ऑगस्टपर्यंत 5 टक्के सवलत जाहीर केली आहे, तर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत कर भरणाऱ्यांना 4 टक्के सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. यासंदर्भात एसएमएस संदेश, जप्ती वॉरंटपूर्व सूचना यांसारख्या माध्यमांतून नागरिकांना वेळोवेळी माहिती देण्यात आली होती. तरीही थकबाकी न भरणाऱ्या मिळकत धारकांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

KDMC revenue recovery drive
Kalyan Shil highway accident : कल्याण-शिळ महामार्गावर भीषण अपघातात तरुणी ठार

सद्यस्थितीत महानगरपालिकेकडून 236 मालमत्ता सील करण्यात आल्या असून 39 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या कारवाईला आणखी वेग देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात जप्ती व अटकावणीसारख्या कडक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्र सुरू

नागरिकांना करभरणा सुलभ व्हावा यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 31 मार्चपर्यंत सर्व शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास 2 टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळणार असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत मालमत्ता कर तातडीने भरून प्रतिमाह 2 टक्के दंड, नळजोडणी खंडित करणे किंवा जप्ती/अटकावणी यांसारखी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन केडीएमसीच्या कर निर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news