

डोंबिवली : शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी सर्वत्र ड्राय-डे अर्थात दारूबंदी राहणार आहे. बारसह दारूची दुकाने बंद राहणार आहेत. कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. याच दिवशी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने मटणाच्या दुकानांसह हद्दीतील सर्व मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचा फतवा जारी केला आहे.
गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी 12 वाजेपर्यंत या 24 तासांच्या कालावधीत केडीएमसी प्रशासनाने हद्दीतील शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी मटण विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
...अन्यथा कारवाई अटळ
या कालावधीत कुणीही कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने सुरू ठेवल्यास किंवा कुणी चोरून लपून विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी कत्तलखाने आणि मटण विक्रेत्यांना दिला आहे.
ड्राय-डेचा फज्जा उडविणार्यांवर लक्ष्य
सद्या श्रावण सुरू असला तरी अनेक खवय्ये आणि मद्यपी बुधवारी, शुक्रवार आणि रविवारी ओल्या पार्ट्या करत असतात. तर मांसाहारी खवय्ये चिकन, मटण आणि मासळीचा आस्वाद घेत असतात. स्वातंत्र्यदिनी शुक्रवार असल्याने मद्यपान करणार्यांसह मांसाहारी खवय्यांचे वांदे होणार आहेत. या दिवशी अनेक विक्रेते चोरी-छुपे मांस आणि दारूची विक्री करत असल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले आहे. या शक्यतेमुळे प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर पाळत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.