डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सन 2023-24 कालावधीतील 7 लाख 36 हजार वृक्षांचा गणना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापुढे कल्याण-डोंबिवलीची ओळख आता सिटी ऑफ ट्री म्हणून होणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले. मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी सोमवारी (दि.14) स्थायी समिती सभागृहात वृक्ष गणना अहवाल सादर केला. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी ही माहिती दिली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विस्तृत अशी बायो डायव्हसिटी उपलब्ध आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या वाढणे देखील महत्वाचे असल्याचे सांगून महापालिका क्षेत्राचे नाव शाश्वत व पर्यावरण पूरक शहर म्हणून घेतले जावे अश्या सदिच्छा आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिल्या.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वृक्ष गणना करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागला आहे. या वृक्ष गणनेसाठी केलेल्या सर्वेक्षणात एकूण 206 प्रजाती आढळून आल्या, ज्यामध्ये आवळा, बेहडा, बहावा, अनंत, वड, पिंपळ, अर्जुन, आपटा, बेल, साग व बिब्बा या सारख्या अनेक देशी प्रजातींचा अंतर्भाव आहे. महापालिका परिक्षेत्रात असलेल्या एकूण 7 लाख 36 हजार 5 वृक्ष संपदेपैकी 5 लाख 66 हजार 975, अर्थात 77 टक्के देशी प्रजातीचे, तर 1 लाख 69 हजार 30 अर्थात 23 टक्के विदेशी प्रजातीचे वृक्ष आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 2 हजार 14 हेरिटेज वृक्ष आहेत. ज्यांचे वयोमान 50 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे. स्वास्थ्य स्थितीचा विचार करता 98 टक्के वृक्ष चांगल्या स्थितीत आहेत. या वृक्ष गणनेसाठी GIS/GPS आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षांचे स्थान, नाव, उंची, वय, वृक्षांची आरोग्य स्थिती याची माहिती मिळू शकेल. अशी माहिती मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी यावेळी बोलताना दिली.